जिल्हा प्रशासनातर्फे फेरी : लाभ घेण्याचे आवाहन, असंघटित कामगारांना लाभदायक योजना
प्रतिनिधी /बेळगाव
पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. असंघटित कामगारांनी याचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ध्वज दाखवून या जनजागृती फेरीचे उद्घाटन केले. पंतप्रधान श्रमयोगी पेन्शन योजना ही देशातील असंघटित कामगारांना फायद्याची आहे. देशामध्ये जवळपास 42 कोटी कामगार असंघटित आहेत. त्यांच्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. विणकर, बांधकाम, हमाल, वीट कामगार, घरकाम करणारे कामगार, चर्मकार, शेतकरी, धोबी, रिक्षाचालक यासह इतर सर्व क्षेत्रात काम करणाऱया असंघटित कामगारांना ही योजना फायद्याची आहे.
या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील साऱयांना लाभ घेता येणार आहे. कामगारांनी मासिक 55 रुपये भरणे बंधनकारक आहे. कामगार कार्यालय, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, ईएसआय कार्यालय, एलआयसी कार्यालय, कॉमन सर्व्हिस सेंटर या ठिकाणी ही रक्कम भरू शकतात. त्यासाठी आधारकार्ड, बँक खात्याचे झेरॉक्स, मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे. तेव्हा याचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जनजागृती फेरीतून करण्यात आले आहे. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









