मराठी भाषेचा वापर नसल्याने उद्दिष्ट साध्य होणे अशक्य : मोहिमेची केवळ औपचारिकताच
प्रतिनिधी/बेळगाव
कचरावाहू वाहनांच्या माध्यमातून प्लास्टिक बंदीबाबत स्पीकरद्वारे आवाहन केले जात आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम याचा संवाद ऐकवला जात आहे. मात्र सदर वाहन एका ठिकाणी किंवा चौकात न थांबता पुढेपुढे जात असल्याने नागरिकांना याबाबत काहीच माहिती मिळत नाही. तसेच केवळ कन्नड भाषेतून जागृती मोहीम राबविण्यात येत असल्याने प्लास्टिक बंदीची कारवाई निष्फळ ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत महापालिकेच्यावतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. घरोघरी व व्यावसायिक ठिकाणी जाऊन कचरा जमा करताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे सांगण्यात येत आहे. तसेच कचरावाहू वाहनांवर स्पीकर लावून त्याद्वारे प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर टाळावा, असे आवाहन केले जात आहे. सदर जागृती मोहिमेंतर्गत प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबाबतची माहिती दिली जात आहे. याकरिता महिला आणि बालिकेच्या संवादाचा वापर केला जात आहे. मात्र हा संवाद केवळ कन्नड भाषेत ऐकविण्यात येत आहे. वास्तविक, शहरात मराठी भाषिकांची संख्या 70 टक्क्मयांहून अधिक आहे.
बेळगावसह चंदगड, गडहिंग्लज, आजरा या महाराष्ट्र तालुक्मयातील आणि गोवा राज्यातील व्यापारी बाजारपेठेत खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे प्लास्टिक बंदीबाबतची माहिती त्यांना समजण्यासाठी मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. कचरावाहू वाहनांच्या माध्यमातून ऐकविला जाणारा संवाद केवळ कन्नड भाषेत असल्याने प्लास्टिक बंदीची माहिती नागरिकांना व्यवस्थित समजत नाही. नागरिकांना समजणाऱया भाषेत प्लास्टिक बंदी असल्याचे सांगण्याची गरज आहे. पण महापालिकेकडून केवळ जागृती मोहीम हाती घेऊन औपचारिकता केली जात आहे. जागृती मोहिमेसाठी केला जाणारा खर्च वाया जात आहे. तसेच जागृती करण्यासाठी सुरू असलेला आटापिटा निष्फळ असल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिका अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्लास्टिक बंदीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांना त्यांच्या भाषेत प्लास्टिक बंदीच्या कायद्याची व कारवाईची माहिती देणे आवश्यक आहे. पण याकडे महापालिका अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. चौक, भाजी मंडई व बाजारपेठेतील गर्दीच्या रस्त्यांवर थांबवून जागृती करणे आवश्यक आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत गर्दी जास्त असते. यावेळेत जागृती केल्यास सर्रास नागरिकांना माहिती मिळू शकते. पण कचरावाहू वाहने एका ठिकाणी न थांबविता जाता जाता आवाहन केले जात आहे. त्यामुळे हा ऐकविला जाणारा संवाद नागरिकांना व्यवस्थित समजत नाही. त्यामुळे मनपाची ही जागृती मोहीम फार्स ठरत आहे.









