एप्रिलमध्ये चार शालेय अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात यश : 2021-22 मध्ये रोखले सुमारे 124 बालविवाह
प्रतिनिधी /बेळगाव
आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात अजूनही बालविवाहांचे प्रमाण सुरूच आहे. त्यामुळे सरकार जनजागृती करत असतानाही अनेकांकडून अशा चुका होतच आहेत. त्यामुळे या दुष्परिणामाबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे. जिह्यात अजूनही याबाबत जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे आता गंभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एप्रिल महिन्यातच चार शालेय अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात आले आहेत. महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱयांना 24 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने लग्नांची धांदल सुरू आहे. ठिकठिकाणी सामूहिक विवाह सोहळे व वधू-वर मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बालविवाह होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यावर नजर ठेवण्यात आली असली तरी नकळत अशा चुका होत आहेत.
अनेकांनी सरकारने केलेल्या आव्हानांकडे दुर्लक्ष करत आपला मनमानी कारभारही केला आहे. सरकारने दिलेल्या मार्गसूचीची पायमल्ली करून बालविवाह करण्यासाठी धडपडणाऱयांचीही संख्या काही कमी नाही. कायद्याने गुन्हा असल्याचे माहिती असूनही अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याचा घाट घातला जात आहे. महिला व बाल कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 मध्ये सुमारे 124 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. तर 16 अल्पवयीन मुलांच्या पालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्यात जिह्यात 24 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यामध्ये बैलहोंगल येथील 4, गोकाक, मुडलगी, हुक्केरी, सौंदत्ती तालुक्यातील प्रत्येकी 3, चिकोडी, रायबाग येथील प्रत्येकी 2, खानापूर, अथणी, बेळगाव तालुक्मयात प्रत्येकी 1 असे एकूण 24 बालविवाह रोखण्यात आले आहेत. दरम्यान बेळगाव तालुक्मयात दोन तर रामदुर्ग व चिकोडी तालुक्मयात एक असे चार बालविवाह झाले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालविवाहाची अधिकाऱयांना कुणकुण न लागण्यासाठी धडपड
महिला व बाल कल्याण विभागाचे उपसंचालक ए. एम. बसवराज यांनी अनेक पालकांना आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असते. तरी देखील ते आपल्या मुलीचे लग्न लावून देतात. परिणामी याचा फटका मुलीच्या आरोग्यावर बसतो. याचबरोबर अशी लग्ने अधिकाऱयांना समजू नयेत यासाठी वधू किंवा वराच्या मूळ गावी, शेजारच्या जिह्यात किंवा गोवा आणि महाराष्ट्रात लग्न उरकून ते आपल्या घरी आणत असतात. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते.
बालविवाहाची मुख्य कारणे
बालहक्क संरक्षण अधिकारी जे. टी. लोकेश यांच्या मतानुसार गरीबी हे बालविवाहाचे प्रमुख कारण आहे. अनेक कुटुंबांमध्ये मृत्युशय्येवर असलेल्या वृद्धांना त्यांची नातवंडे अल्पवयीन असली तरी त्यांचे लग्न झालेले पहायचे असते. त्यामुळे मोठय़ा भावंडांच्या मंडपामध्येच लहान भावंडांचे लग्न लावण्याची इच्छा ते व्यक्त करतात. यामुळेच काही अल्पवयीन मुले विशेषतः मुलींची लग्ने उरकण्यासाठी धडपड करण्यात येते.
मदतीसाठी 1098 क्रमांकावर संपर्क साधा
ज्यांना मदत हवी आहे ते 1098 या हेल्पलाईनवर फोन करून आपले संरक्षण करून घेऊ शकतात, तर काही ठिकाणी ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे बालविवाह रोखण्यास मदत होते. सुटका केलेल्या मुले अथवा मुलींना सौंदत्ती किंवा बेळगाव येथील वसतिगृहात राहण्याची सोय करण्यात येते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. सुरूवातीला त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येते, असेही जे. टी. लोकेश यांनी सांगितले.
जिह्यात एप्रिलमध्ये दाखल करण्यात आलेली प्रकरणे
| तालुका | प्रकरणे |
| बेळगाव | 2 |
| रामदुर्ग | 1 |
| चिकोडी | 1 |
| एकूण प्रकरणे | 4 |
एप्रिलमध्ये रोखण्यात आलेले विवाह
| बैलहोंगल | 4 |
| गोकाक | 3 |
| मुडलगी | 3 |
| हुक्केरी | 3 |
| सौंदत्ती | 3 |
| चिकोडी | 2 |
| रायबाग | 2 |
| खानापूर | 1 |
| रामदुर्ग | 1 |
| अथणी | 1 |
| बेळगाव | 1 |
| एकूण | 24 |









