खानापूर : सीमाप्रश्नाच्या लढ्यात अनेकांनी हुतात्मे दिले आहेत. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याची परंपरा आहे. खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने हुतात्मा दिन येथील स्वर्गीय नागाप्पा होसूरकर स्मारकाजवळ अभिवादन करून पाळला जातो. यानुसार यावर्षीही स्व. नागाप्पा होसरूकर यांच्या स्मारकाला सकाळी 8.30 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. समिती कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 17 जानेवारी हुतात्मा दिन पाळण्यासंदर्भात खानापूर शहरात सोमवारी पदयात्रा काढून पत्रके वाटून जागृती करण्यात आली. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, चिटणीस आबासाहेब दळवी, माजी सभापती मारुती परमेकर, समिती नेते गोपाळ देसाई, प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, राजाराम देसाईयासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूरला धरणे आंदोलनात सहभागी होणार
17 जानेवारी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून सकाळी 9 वाजता स्टेशन रोड खानापूर येथील हुतात्मा कै.नागाप्पा होसूरकर स्मारकाला अभिवादन केल्यानंतर सकाळी 11 वाजता वर्दे पेट्रोल पंप खानापूर येथे सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. या कार्यक्रमातही खानापूर तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन म. ए. समितीतर्फे करण्यात आले.









