महापालिकेचा पुढाकार : स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून जागृती
बेळगाव : रस्त्याच्या कडेला किंवा अन्यत्र कचरा न टाकता महापालिकेच्या घंटागाडीकडेच कचरा देण्यात यावा, यासाठी महानगरपालिकेकडून शहर व उपनगरात जनजागृती केली जात आहे. यासाठी स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. विशेष करून बाजारपेठ परिसरातील गल्ल्यांमध्ये जनजागृती करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील एका नवीन ठेकेदाराला देण्यात आला असून 1 ऑगस्टपासून नवीन ठेकेदाराने काम सुरू केले आहे. नवीन ठेकेदाराकडून महापालिका व बेळगावकरांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरीही अद्याप म्हणावे तसे स्वच्छतेचे काम होताना दिसत नाही. यापूर्वी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याची उचल करीत होते. मात्र, आता घंटागाडी घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करत नसल्याच्या तक्रारी आहेत.
गल्लीत मोक्याच्या ठिकाणी थांबून कचरा घेऊन येण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन केले जात आहे. त्यामुळे बहुतांश जण घंटागाडीकडे कचरा न देता गाडी गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देत असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्लॅकस्पॉट तयार होत आहेत. सदर ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे तेथील कचऱ्याची उचल करून फुलांची सजावट, बाकडे व तुळशीकट्टा ठेवला जात आहे. सातत्याने ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी महापालिकेला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे स्थानिक नगरसेवक व स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. कोठेही कचरा न टाकता महापालिकेच्या घंटागाडीकडेच ओला व सुका कचरा वर्गीकरण करून देण्यात यावा, असे सांगितले जात आहे.









