कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची धास्ती : प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची चौथी लाट पसरण्याची धास्ती निर्माण झाली असून प्रशासनाच्यावतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने मास्क परिधान करण्याची सक्ती केली असून याची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मास्क वापरण्याची जनजागृती करण्यासह विनामास्क कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
तोंडावरील मास्क हटविण्यास केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळाला होता. मात्र आता चौथ्या लाटेची धास्ती निर्माण झाल्याने पुन्हा मास्क वापरावे लागणार आहे. मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आल्याने सरकारी कार्यालयांसह सर्वत्र मास्क परिधान करण्याची सूचना करण्यात येत आहे. महापालिकेने कार्यालयापासूनच मास्क सक्तीच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला आहे. महापालिका कार्यालयात येणाऱया नागरिकांना विनामास्क प्रवेश देण्यास प्रतिबंध केला आहे. त्याचप्रमाणे शहरात जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. विनामास्क फिरणाऱयांना मास्क परिधान करण्याची सूचना करण्यात येत आहे.
कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटमुळे कोरोनाची क्षमता किती आहे? याची माहिती सहजासहजी कळत नाही. त्यामुळे खबरदारी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आरोग्य खाते आणि महापालिकेने जागृती मोहीम हाती घेतली आहे. बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना करून मास्क परिधान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.