2027 पर्यंत 150 मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय पूर्ण करा : वीजमंत्री सुदिन ढवळीकर
वास्को : पीएम सूर्यघर व पीएम कुसुम या ऊर्जा योजना गोव्यातील प्रत्येक घरांपर्यंत पाहोचवा. 2027 पर्यंत 150 मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. आतापर्यंत आपल्याला 23 मेगावॅटपासून 67 मेगावॅटपर्यंत हरित ऊर्जा निर्माण करण्यास यश आल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर व पीएम कुसुम या ऊर्जा निर्मिती योजनांच्या जागृतीला काल शुक्रवारी वास्कोतून प्रारंभ करण्यात आला. गोवा ऊर्जा विकास संस्था व नवीन व अक्षय ऊर्जा खाते या राज्य सरकारच्या संस्थांतर्फे मुरगावच्या रवींद्र भवनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अॅड. अनिता थोरात, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर, नगरसेवक, सरपंच, पंच, शासकीय अधिकारी राजीव सामंत, गौरेश पिळगावकर, सोहन उस्कैकर, संजीव जोगळेकर, भगवंत करमली व इतर अधिकारी उपस्थित होते.
हरित ऊर्जा निर्मिती, वापराचे अधिकाधिक प्रयत्न करा
मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलीत करुन या जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी, हरित ऊर्जा निर्मिती व तिच्या वापराचे अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा योजना घराघरांपर्यंत पाहोचवा, असे आवाहन त्यांनी स्थानिक नगरसेवक, पंच तसेच शासकीय अधिकाऱ्यांना केले. उपस्थित शिक्षक वर्गालाही त्यांनी हरित ऊर्जा योजनेचा प्रसार करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून भारत बदलाय सुरुवात झाली.
सध्या भारत आर्थिक शक्तीत जगात पाचव्या स्थानावर आहे. लवकरच आपला देश तिसरे स्थान प्राप्त करेल. विकासासाठी पंतप्रधानांनी वीज आणि साधनसुविधांच्या निर्मितीवर भर दिलेला आहे. एक हजार मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय केंद्र सरकारने ठेवलेले आहे. गोव्यातही हरित ऊर्जा निर्मितीला बळ मिळत आहे. 23 मेगावॅटवरून 67 मेगावॅट हरित ऊर्जा उपलब्ध करण्यास यश आलेले आहे. 2027 पर्यंत 150 हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा, असे वीजमंत्री म्हणाले.
कोळशाचा वापर कमी करण्यासाठी हरित ऊर्जेची जागृती करा
कोळसा कोणालाच नको आहे, परंतु 75 टक्के वीज कोळशापासूनच तयार केली जाते. हे प्रमाण कमी होण्यासाठी हरित ऊर्जा निर्मितीचा प्रसार आणि वापर व्हायला हवा. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे असे मंत्री ढवळीकर म्हणाले. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी, हरित ऊर्जा प्रसारासाठी सर्वांनी मिळून कार्य करायला हवे. नगरपालिका, पंचायतीनीही हरित ऊर्जा वापरावर भर द्यावा. शासकीय अधिकाऱ्यांनी व इतरांनी हरित ऊर्जा प्रसाराचे लक्ष्य ठरवावे व प्रत्येक घराघरांपर्यंत जावे, असे आवाहन त्यांनी केले.
देस्तेरोपासून बायणापर्यंत सौर ऊर्जेवरील पथदीप योजना
आमदार संकल्प आमोणकर यांनी हरित ऊर्जा योजनेचा जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच देस्तेरोपासून बायणापर्यंतच्या मच्छीमारांच्या सोयीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे तीनशे पथदीप उभारण्याची योजना असून या योजनेची त्वरित कार्यवाही व्हावी, अशी मागणीही आमदार आमोणकर यांनी केली. हरित ऊर्जा योजनेच्या प्रसारासाठी सर्वांनीच वाटा उचलायला हवा. तरच यश शक्य आहे. देश प्रथम या उद्देशानेच पंतप्रधान मोदी निर्णय घेत असतात व देश जोडण्याचे कार्य ते करीत असतात, असे आमदार दाजी साळकर म्हणाले. यावेळी हरित ऊर्जा योजनांच्या प्रचारासाठी खास टी शर्ट व कॅपचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नवीन व अक्षय ऊर्जा खात्याचे संचालक सोहन उस्कैकर यांनी केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर व पीएम कुसुम या ऊर्जा योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. गोवा ऊर्जा विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक गौरेश पिळगावकर यांनी सौर ऊर्जा निर्मितीविषयी मार्गदर्शन केले. ऊर्जा विकास योजनांच्या प्रचाराच्या शुभारंभी कार्यक्रमापूर्वी राष्ट्रगान वंदे मातरम गायनाचा कार्यक्रमही झाला.









