कोल्हापूर / संतोष पाटील :
क्रिप्टोकरन्सी या ई–कॅश किंवा डिजिटल करन्सीमध्ये कोल्हापूरकरांनी तब्बल दोन ते अडीच हजार कोटी रुपये घातल्याची माहिती आहे. वर्षाला तिप्पट रक्कमेची हमी देणाऱ्या या आभासी चलनाच्या हवेवर कोल्हापूरकरांनी आर्थिक फायद्याचे इमले बांधले होते. बिटकॉईनसारख्या अभासी चलनात आर्थिक झळ बसल्यानंतर कोल्हापूरकर भानावर आल्याची सुखद माहिती आहे. अभासी चलनाची मागील काही वर्षांपासूनची भुरळ कमी झाल्याने यातील गुंतवणूकही कमी झाली आहे.
क्रिप्टोकरन्सी हे इंटरनेटवर वापरण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तयार केले जाते. रुपया किंवा डॉलरसारख्या पारंपरिक चलनासारखे नोट किंवा नाण्यांमध्ये क्रिप्टोकरन्सी मिळत नाही. ज्याप्रमाणे बँक खात्यात पैसे ठेवतो आणि इंटरनेट बँकिंगद्वारे शिल्लक तपासता, त्याचप्रमाणे क्रिप्टोकरन्सी व्हर्च्युअल वॉलेटमध्ये ठेवले जातात. इंटरनेट वापरून मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून ते अॅक्सेस करता येतात. याचा पासवर्ड हीच या अभासी पैशाच्या तिजोरीची किल्ली आहे. पासवर्ड विसरला तर त्याची रिकव्हरी जवळपास अशक्य असते. बहुतेक वेळा हा पासवर्ड किंवा की ही दुहेरी पध्दतीने वापरली जाते. ज्याच्याकडे गुंतवणूक केली आहे, त्याने हात वर केल्यास घातलेला पैसा परत मिळणे केवळ अशक्य आहे.
गेल्या वर्षी काही महिन्यांत एका बिटकॉईनची किंमत 30 हजार डॉलरवरुन 60 हजार डॉलरवर गेली. यामध्ये होणारा चढउतार अकारण आणि विस्मयकारक आहे. दरवर्षी बिटकॉईनच्या किंमती वाढत असल्याने परतावा घेण्यापेक्षा यामध्ये पूर्ण माहिती नसतानाही दुरस्थ यंत्रणेमार्फत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. हेच येथील फसवणुकीचे मोठे कारण आहे. आजच्या काळात बहुतेक वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी याचा वापर करता येत नाही. सरकारने अद्याप क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतेही नियमन केलेले नाही. त्यामुळे या आभासी चलनाबाबत एक प्रकारचा विश्वासाचा मुद्दाही समोर आला होता. या आभासी चलनाचे वास्तव आता पुढे आल्याने यातील गुंतवणूकही कमी झाली आहे.
व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2020 मध्ये परवानगी दिली. एप्रिल 2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. त्यापूर्वी बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती.
प्रत्यक्षात कवडीही नाही
कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन ‘छापत’ नाही. क्रिप्टो करन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनमार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. क्रिप्टो करन्सी ही फक्त ऑनलाईन असते आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेली असते. ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.
शेअर बाजार हे नियामक संस्थांकडून चालवले जातात. म्हणजे व्यवहारांवर नियामक मंडळाचं लक्ष असते. पण इथे तसे नाही. बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन चालतात आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या फक्त दोन व्यक्तींमध्ये होतात आणि त्यावर इतर कुणाचेही नियंत्रण नसते. सगळे व्यवहार ऑनलाईन आणि त्याचबरोबर फक्त दोन अकाऊंट दरम्यान होतात. कुठलाही मध्यस्थ नसतो. कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. यात मध्यस्थाची गरज नसते. त्यामुळे अशा व्यवहारात फसवणुकीची मोठी शक्यता होती आणि तशी झालीही. बिटकॉईनमध्ये गुंतवलेले पैसे आता पन्नास पट झाल्याचे फक्त दिसते, प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळाल्याचे एकही उदाहरण कोल्हापुरात नाही.
ब्लॉकचेनच्या वापराने बंधन
क्रिप्टो करन्सीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरले जाते. ब्लॉकचेन व्यवहार डेमोक्रॅटिक किंवा मुक्त मानले जातात. सध्या रशिया आणि अर्जेंटिना वगळता इतर देशांमध्ये बिटकॉईन व्यवहार सुरू आहेत. यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलेही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो. तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एक्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्युटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात. हे चलन आभासी आहे, गोपनीय आहे आणि एका 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या अॅड्रेसमार्फत बिटकॉईनचे व्यवहार होतात. या पत्त्याची कुठेही नोंद नसते. त्यामुळे व्यवहार गुप्त राहतो. शिवाय या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचं वा सरकारचं नियंत्रण वा लक्ष नसतं. या व्यवहारांसाठी काही नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
सजगता वाढली
क्रिप्टो करन्सीतील गुंतवणूक ही बुडीत होते. या व्यवहाराचे आयपी अॅड्रेस लांबच पासवर्ड विसरला तरीही रिकव्हर होत नाही. बिटकॉईनसारख्या आभासी चलनातील गुंतवणूक फसवणुकीची असल्याबाबत लोकांमध्ये आता सजगता वाढली आहे. पर्यायाने यातील गुंतवणुकीचा ओढा कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि ही एक चांगली बाब आहे. सायबर गुन्हेगारीबाबतही नागरिकांनी अशीच सजगता दाखवण्याची गरज आहे.
रविंद्र कळमकर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूर








