वार्ताहर/काकती
कर्नाटक सरकारने सीमाभागात सक्तीने कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्याचे धोरण अवलंबले आहे. परिणामी मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषिकांवरती होणारा अन्याय सहन करू शकणार नाही. याकरिता मराठी भाषिकांच्यावतीने गुरुवारी होळीचौक येथे सभा घेण्यात आली व जनजागृती फेरी काढण्यात आली. मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने सोमवार दि. 11 रोजी छत्रपती संभाजी चौक येथून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व मराठी भाषिकांनी सहभागी होऊन मराठी भाषेला समर्थन करण्याचे ठरविण्यात आले. कानडीकरणाला विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. म. ए. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण पाटील, मनोहर परमोजी, अशोक देसाई, परशराम धोणजी, रेवाणी पवार, नागो बाजरेकर, जोतिबा नार्वेकर, पांडू कंग्राळकर, सिद्राई धोणजी, मोहन कंग्राळकर, सिद्राई सोनुलकर आदी निष्ठावंत कार्यकर्त्यांसह मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









