प्रतिनिधी /खानापूर
येथील शासकीय महाविद्यालयात पोलीस खाते, एनएसएस, स्काऊट-गाईड यांच्यावतीने अमलीपदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप जवळकर होते.
अमलीपदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांबाबत शासनाच्यावतीने जागृती करण्यासाठी कार्यक्रम राबविण्याची योजना आहे. याचाच एक भाग म्हणून खानापूर पोलीस स्थानकाच्यावतीने बुधवारी शासकीय महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरीक्षक जालीहाळ यांनी प्रास्ताविक करून अमलीपदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ. एस. बी. तांबोजी यांनी या व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर विवेचन केले. तरुणांनी व शालेय विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, व्यसनाचा परिणाम शरीरावर, आपल्या घरातील सदस्यांवर व समाजावरही होतो, याची जाण ठेवावी. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी सध्या तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे वाढलेले प्रस्थ, त्यातून निर्माण होणाऱया घटनांतून विकृती तसेच चोरीसारख्या कामांकडे माणूस प्रवृत्त होतो. म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्याचे ध्येय डोळय़ासमोर ठेवून वाटचाल
करावी, असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात व सांगता गडकरी हिच्या गायनाने झाली. संगीता हिने ईशस्तवन केले. अंबरिश रेवतगाव यांनी स्वागत केले. ए. एफ. नायक यांनी आभार मानले.









