शहर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ : रेबिज अटकावासाठी लसीकरण : पशुसंगोपनमार्फत मोहीम
बेळगाव : शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पशुसंगोपन खात्याने रेबिजबाबत जागृतीचे काम हाती घेतले आहे. शिवाय कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस टोचली जात आहे. मागील पंधरा दिवसांपासून ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात आहे. भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकताच शहरातील एका बालकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस द्यावी, असे आवाहन खात्यामार्फत केले जात आहे. विशेषत: शाळास्तरावर जागृती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शहरात 20 हजारहून अधिक भटकी कुत्री आहेत. त्यांच्याकडून हल्लेही वाढू लागले आहेत. त्यामुळे पशुसंगोपन खात्याने ही बाब अधिक गंभीरपणे घेतली आहे. पशुचिकित्सालय अखत्यारित येणाऱ्या गावांमध्ये आणि शाळांमध्ये जागृती केली जात आहे. विशेषत: ग्रामीण भागात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस दिली जात नाही. मात्र, त्यांच्याकडून धोका उद्भवतो. यासाठी जागृतीचे काम हाती घेतले आहे. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांतून सर्वच कुत्र्यांना प्रतिबंधक लस दिली जात आहे. दरम्यान, रेबिजचा प्रसार कसा होतो, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर उपचार कोणते घ्यावेत, याबाबत जागृती केली जात आहे.
सप्टेंबर महिन्यात रेबिज पंधरवडा
पशुसंगोपन खात्यामार्फत पुढील सप्टेंबर महिन्यात रेबिज पंधरवडा साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत सर्वत्र जागृती करून महारेबिज प्रतिबंधक मोहीम राबविली जाणार आहे. तसेच एकही कुत्रा लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.









