उचगाव / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश केसरकर व उचगाव माजी उपसरपंच सौ गौरी सतिश मुसळे या दोघांना पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय तसेच सातत्याने सेवाभावीवृत्तीने वैशिष्ठयपूर्ण कार्य केल्याबद्दल, देशाची राजधानी दिल्ली येथे संसद भवन मध्ये झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमावेळी भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण विभागाच्यावतीने दिला जाणारा “राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार- २०२३” देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी देशातील व परदेशातील उदयोग, पर्यावरण, सामाजिक क्षेत्र व शेती अशा विविध क्षेत्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्या २५ जणांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुरेश केसरकर हे जिल्ह्यातील विविध सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहेत. तर गौरी मुसळे या महिला वर्गातील सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी महालक्ष्मी फौंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत. घरेलु महिला कामगारांच्या विविध प्रश्नां संदर्भात त्या सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून महिला कामगार वर्गाला न्याय मिळवून दिला आहे.
अवयवदान- देहदान चळवळीचा प्रचार, शासनाच्या सर्व योजना व उपक्रम, कामगार मेळावे, बाल संस्कार वर्ग, योगा वर्ग, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे, पल्स पोलिओ लसीकरण, एड्स विषयक जनजागृती आदी सामाजिक विषयांमध्ये त्यांनी कार्य केले आहे.
संसद भवनमध्ये झालेल्या सोहळ्यास जागतीक पर्यावरण समितीचे प्रमुख अतुल बगाई, केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले, विजय कुमार, विजयराजे ढमाळ, दुबईचे उद्योगपती डॉ. अब्दुला, युनायटेड अरब अमिरातचे रवि पंडीत, केरळच्या सुलोचना शिवानंद, आसामच्या डॉ. आस्मा, सिने अभिनेत्री दिपाली सय्यद त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रशासनातले ज्येष्ठ सनदी अधिकारी, जागतीक व देश पातळीवर भरीव कार्य केलेले मान्यवर व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.