केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
पुरस्कार म्हणजे केलेल्या कार्याचे कौतुक असून समाजासाठी काही भले काम करु इच्छिणाऱयांसाठी प्रेरणा ठरते. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि कल्याण म्हणजेच देशाचा विकास होय, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
रिबिल्ड इंडिया ट्रस्ट आणि अनुसूचित जाती कल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीत शनिवारी आयोजित ’गोवा स्टार पुरस्कार 2022’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी मंत्री नाईक यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत आहे. अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे, असे ते पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत यांनी बोलताना अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ’रिबिल्ड इंडिया ट्रस्ट’ आणि अनुसूचित जाती कल्याण संघटना यांच्या आगामी काळातील कृती आराखडय़ाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जातीतील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अभियांत्रिकी, शिक्षण, समाज सेवा, कला आणि संस्कृती आदी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा त्यात समावेश होता.









