सातारा :
नव्या पिढीतील प्रतिभावंतांच्या निर्मितीचा गौरव म्हणजे उगवल्या पिढीतील सारस्वतांच्या लेखन यज्ञाला दिलेली प्रेरणाच. कौतुकाची थाप म्हणजे नव साहित्यिकांच्या लिहित्या हातांना आणि लेखनीला दिलेले खरे बळ असते. ग्रंथ, ग्रंथालय, ग्रंथकर्ता ग्रंथवाचक आणि ग्रंथालय कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेला गतीमान करण्याचे काम अशा उपक्रमातून होत असते. पुरस्कार म्हणजे थांबा नसतो तर प्रेरणा प्रदान करणारा ऊर्जा स्रोत असतो, असे प्रतिपादन प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय सातारा मार्फत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी साहित्यिक डॉ. राजेंद्र माने अध्यक्षस्थानी होते. मंचावर वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुनीता उत्तेकर, उपाध्यक्ष प्राचार्य प्रमोदिनी मंडपे, कार्यवाह सुनीता कदम, संचालक डॉ. अनिमिष चव्हाण उपस्थित होते.
ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सौ. राजश्री शहा सातारा यांनी अनुवाद केलेल्या व्हाईट टॉर्चर या ग्रंथास तर सौ. सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार कवी अमोल अहेर शिव पुणे यांच्या अंतरीचा कॅनव्हास या कवितासंग्रहास प्रदान करण्यात आला. त्याचवेळी मोहन काळे मुंबई यांच्या एकदा आपणच व्हावे मोर आणि सौ. भारती धनवे यांच्या दर्शन मात्रे या ग्रंथास उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. तसेच शुभांगी दळवी, अॅड. संगीता केंजळे, डॉ. आदिती काळमेख आणि आनंदा ननावरे या साहित्यिकांना प्रेरणा पुरस्कारांनी गौरवाकिंत करण्यात आले.
प्रा. साळुंखे म्हणाले, ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण सा. ग्रंथालयाचे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार म्हणजे साहित्य शारदेचा दरबार आपल्या अक्षर सूजनाने शोभायमान करणारांचा सन्मान सोहळाच. ग्रंथालय व वाचन चळवळीसाठी अंत:करणापासून धडपणारे कार्यकर्ता व्यक्तिमत्व म्हणजे स्व. डॉ. शिवाजीराव चव्हाण सर ! ग्रंथालय चळवळीचा संरकार तीन तीन पिढ्यात संक्रमित करणारा परिवार म्हणजे चव्हाण परिवार, असे त्यांनी सागितले.
डॉ. राजेंद्र माने म्हणाले, समाजातला भोवताल साहित्यात सजगपणे प्रतिबिंबित करणे हे साहित्यिकाचे कर्तव्य असते. साहित्यिकांनी लोकधर्म पाळून माणसा माणसा मधला संवाद व नाते जिवंत ठेवायला पाहिजे. साहित्य हे माणूस जोडण्यासाठी असते, असे त्यांनी सांगितले. यावेळी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मनोगते व्यक्त केली व ग्रंथालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या पुरस्कारांचे परीक्षक म्हणून डॉ. वैशाली चव्हाण व नंदा जाधव आणि डॉ. नीला उत्तेकर यांनी कार्य केले. डॉ. वैशाली चव्हाण आणि डॉ. नीला उत्तेकर यांनी त्या मागची भूमिका स्पष्ट केली. प्रास्तविक प्राचार्य प्रमोदिनी मंडपे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नीला उत्तेकर, कार्यवाह सुनीता कदम यांनी आभार मानले.








