ब्रिटनमधील जॉन इवान्सची थक्क करणारी कामगिरी
वयाच्या 75 व्या वर्षीही एक व्यक्ती स्वतःच्या तंदुरुस्तीमुळे चर्चेत राहिला आहे. त्याचे बॅलेन्सिंग पाहून समोरचा व्यक्ती थक्क होऊन जातो. या व्यक्तीचे नाव जॉन इवान्स असून त्याने एक किंवा दोन नव्हे तर 100 विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. एकदा तर त्याने स्वतःची मिनी कारच डोक्यावर घेतली होती.
जॉनने 33 सेकंदांपर्यंत संतुलन न गमावता कार डोक्यावर ठेवली होती. जॉनच्या या कामगिरीमुळे तो जगभरात प्रसिद्ध झाला. ही घटना 23 वर्षे जुनी असली तरीही सध्या त्याने केलेल्या कामगिरीमुळे लोकांच्या मनातील जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

ब्रिटनच्या डर्बीशायरमध्ये राहणारा जॉन इवान्स स्वतःच्या डोक्यावर अवजड गोष्टी ठेवून संतुलन राखण्यासाठी ओळखला जातो, त्याला ब्रिटनचा स्ट्राँगमॅन देखील म्हटले जाते. अलिकडेच त्याने स्वतःच्या 75 व्या जन्मदिनी 85 किलो वजनाचा लाकडाने तयार केलेला विशाल मुकूट स्वतःच्या डोक्यावर ठेवून संतुलन साधले, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
ही कामगिरी करून त्याने 100 विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. स्वतःच्या ‘हेड-बॅलेन्सिंग ऍक्ट’द्वारे धर्मादायासाठी त्याने सुमारे 2.5 कोटी रुपये देखील जमविले आहेत. 1999 मध्ये स्वतःच्या डोक्यावर एक मिनी कार ठेवून संतुलन राखल्यावर जॉन चर्चेत आला होता. ही कामगिरी करण्यासाठी त्याचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स बुकमध्ये नोंद झाले होते. जॉनने डोक्यावर उचलून घेतलेली कार 159 किलोहून अधिक वजनाची होती.
याचबरोबर जॉनने विविध श्रेणींमध्ये वेगवेगळे वजन स्वतःच्या डोक्यावर ठेवून संतुलन साधून दाखविले आहे. कधी बियरचे शेकडो ग्लास डोक्यावर ठेवले तर कधी आणखीन काही वेगळे. त्यांचे संतुलन कमालीचे आहे.









