प्राण्याला पाहून लोकांचा उडाला थरकाप
माणूस आणि प्राण्यांची मैत्री कित्येक शतके जुनी आहे. माणसांनी काही प्राण्यांना नेहमीपासून पाळीव करून ठेवले आहे. श्वान, अश्व, बकरी, डुक्कर, गाय इत्यादी प्राण्यांवर लोक प्रेम देखील करतात. परंतु कधी तुम्ही कुणाला मगर पाळताना पाहिले आहे का ? एका व्यक्तीने चक्क मगरच पाळली आहे. अलिकडेच या व्यक्तीने या मगरीला एक बेसबॉल मॅच दाखविण्यासाठी नेले होते. परंतु लोकांनी या मगरीला पाहिल्यावर तेथे खळबळ उडाली.

अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये एका बेसबॉल सामन्यादरम्यान हैराण करणारे दृश्य लोकांना दिसून आले. जोई हेनरी नावाचा व्यक्ती स्वत:ची 6 फूट लांब आणि 24 किलो वजन मगरीसोबत मेजर लीग बेसबॉल गेम पाहण्यासाठी गेला होता. हा सामना सिटिजन बँक पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता, परंतु हेन्रीला तेथे प्रवेश करु देण्यात आला नाही. सामन्यकरता गाइड डॉग, सर्व्हिस अॅनिमल आणि ट्रेनिंग करणाऱ्या सर्व्हिस अॅनिमलला प्रवेश करण्याची अनुमती होती. उर्वरित प्राण्यांना आत नेण्यास अनुमती नसल्याचे हेन्रीला आयोजकांकडून सांगण्यात आले.
हेन्रीसाठी हा प्राणी केवळ मगर नसून त्याचा भावनात्मक आसरा होता. एकेकाळी नैराश्यात असताना या मगरीनेच यातून बाहेर येण्यास मदत केली होती. मगरीला अन्य बेसबॉल सामन्यांकरता घेऊन गेलो आहे. येथेही जाण्याची अनुमती मिळेल असे वाटले होते. मगरीला मी कुशीत घेतले होते. ही मगर आता 8 वर्षांची झाली असल्याचे हेन्रीने सांगितले आहे.
ही मगर कधीच संतापत नाही, तसेच हल्लाही करत नाही. या मगरीने कधीच चावा घेतलेला नाही. ही मगर माझ्यासोबतच झोपते असे हेन्रीने सांगितले आहे. वॉली असे नाव असलेल्या या मगरीचे इन्स्टाग्रामवर 30 हजारांच्या आसपास फॉलोअर्स आहेत.









