क्षमता 500 जनावरांची : गो-शाळेत केवळ मोजकीच जनावरे : पशुपालकांचे खासगी गो-शाळांनाच प्राधान्य
बेळगाव : जिल्ह्यातील भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी हुक्केरी तालुक्यातील बेळवी या ठिकाणी गो-शाळा उभारण्यात आली आहे. मात्र, या गो-शाळेकडे पशुपालकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे 500 जनावरांच्या क्षमतेच्या गोठ्यात केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच जनावरे दाखल झाली आहेत. त्यामुळे सुसज्ज गो-शाळा जनावरांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. भाकड आणि भटक्या जनावरांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सरकारी गो-शाळा उभारण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळवी या ठिकाणी तब्बल 19.4 एकर क्षेत्रात गो-शाळा उभारण्यात आली आहे. मात्र, या गो-शाळेत दाखल होणाऱ्या जनावरांची संख्या अगदी नगण्य आहे. गो-शाळा उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तब्बल 500 जनावरांसाठी गो-शाळा उभारण्यात आली असली तरी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच जनावरे सद्यस्थितीत गो-शाळेत आहेत. जिल्ह्यातील दूध क्षमता कमी झालेल्या, आजारी आणि वृद्ध व भटक्या जनावरांसाठी गो-शाळा निर्माण करण्यात आली आहे. मात्र, या गो-शाळेत दाखल होणाऱ्या जनावरांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे गो-शाळा ओस पडू लागल्या आहेत. एकीकडे लाखो रुपये खर्च करून गोठा, हौद, लाईट, फॅन आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जनावरांच्या देखभालीसाठी कर्मचारी आणि पशुवैद्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, जनावरेच अधिक नसल्याने हा सारा खर्च वाया जावू लागला आहे.
या गो-शाळेचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले तरी अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गो-शाळेत काही मोजकीच जनावरे दिसत आहेत. गो-शाळेचा संपूर्ण खर्च पुण्यकोटी योजनेंतर्गत केला जात आहे. काही जनावरे दानशूर व्यक्तींना दत्तक म्हणून दिली जात आहेत. मात्र, गो-शाळेत जनावरांची संख्या अगदी कमी असल्याने दानशूरांचीदेखील अडचण होऊ लागली आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या आदींचा समावेश आहे. दरम्यान, भाकड जनावरांची संख्यादेखील मोठी आहे. वृद्ध आणि आजारी जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा जनावरांना या गो-शाळेत प्रवेश दिला जातो. मात्र, मागील वर्षभरात दाखल होणाऱ्या जनावरांची संख्या कमी आहे. गो-शाळेत दाखल होणाऱ्या जनावरांना सकस आहार, शुद्ध पाणी आणि इतर सोयी-सुविधा पुरविल्या जातात. मात्र, दाखल करणाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. काही पशुपालक अद्यापही खासगी गो-शाळांनाच प्राधान्य देत असल्याने सरकारी गो-शाळा जनावरांविना राहू लागली आहे.
नागरिकांनी लाभ घ्यावा
बेळगी या ठिकाणी सरकारी गो-शाळा उभारली आहे. मात्र, गो-शाळेत दाखल होणाऱ्या जनावरांची संख्या कमी आहे. या ठिकाणी मोफत प्रवेश मिळतो. या ठिकाणी जनावरांची काळजी घेऊन विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. या गो-शाळेमुळे कत्तलखान्याकडे पाठविणाऱ्या जनावरांना ब्रेक लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
– डॉ. रमेश कदम-हुक्केरी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी









