केवळ 9 जनावरे दाखल : 500 जनावरांच्या क्षमतेचा गोठा : सेंद्रिय खत-औषध निर्मिती योजनाही बारगळल्या
बेळगाव : भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारी गो-शाळा उभारण्यात आली आहे. मात्र, या गो-शाळेला प्रतिसाद थंडावला आहे. आतापर्यंत केवळ 9 जनावरे दाखल झाली आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेली गो-शाळा जनावरांविना पडून असल्याचे दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक गो-शाळा उभारण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात बेळवी (हुक्केरी) या ठिकाणी तब्बल 19.4 एकर क्षेत्रात गो-शाळा उभारण्यात आली आहे. मात्र, या गो-शाळेत जनावरे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. दूध आटलेली जनावरे कत्तलखान्यांकडे पाठविली जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी गो-शाळा उभारण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी येणाऱ्या जनावरांची संख्या अगदी नगण्य असल्याचे दिसत आहे.
गो-शाळा जनावरांविना पडून
विशेषत: आजारी आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जनावरांना या गो-शाळेत प्रवेश दिला जातो. मात्र, अशी जनावरेही या गो-शाळेत येत नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी मोठ्या थाटामाटात गो-शाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, मागील वर्षभरात केवळ 9 जनावरेच दाखल झाली आहेत. तब्बल 500 जनावरांच्या क्षमतेची ही गो-शाळा जनावरांविना पडून असल्याचे दिसत आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक
या गो-शाळेत गोठा, पाण्याचे हौद, लाईट, फॅन यासह इतर सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय गो-शाळेचा संपूर्ण खर्च पुण्यकोटी योजनेंतर्गत केला जात आहे. मात्र, जनावरेच येत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. या गो-शाळेत गाय, बैल आणि वासरांना प्रवेश दिला जातो. मात्र, जिल्ह्यातील मोठ्या असणाऱ्या सरकारी गो-शाळेत जनावरे दाखल होत नसल्याचे दिसत आहे.
सेंद्रिय खत निर्मिती योजना बारगळली
गो-शाळेत येणाऱ्या जनावरांच्या शेणापासून सेंद्रिय खताची निर्मिती आणि गोमुत्रापासून औषधे तयार केली जाणार होती. मात्र, गो-शाळेत जनावरेच येत नसल्याने या साऱ्या योजना बारगळल्या आहेत. शिवाय गो-शाळा जनावरांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसात जनावरांची संख्या वाढेल
बेळवी येथील गो-शाळा मागील सहा महिन्यांपासून जनावरांना खुली करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. याबाबत अद्याप म्हणावी तशी जागृती नाही. येत्या काही दिवसात गो-शाळेमध्ये जनावरांची संख्या वाढेल.
-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक, पशुसंगोपन खाते)









