कोल्हापूर :
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी 1 हजार 445 कोटी आणि जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी 259 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यापैकी जोतिबा विकास आराखड्याचे काम सुरू झाले आहे. परंतू अंबाबाई विकास आराखड्याचा निधी मंजूर होऊन दीड महिना झाला तरी निधीची प्रतीक्षा आहे. भूसंपादनाचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे.
अहिल्यानगर येथील चौंडी या गावी 6 मे 2025 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 5 हजारहून अधिक कोटींच्या निधीच्या कामांना मंजूर देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. जोतिबा आणि अंबाबाई दोन्हीसाठी निधी मंजूर झाला. अंबाबाई मंदिर व परिसर पुर्नविकास आराखड्यासाठी 1 हजार 444 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर 28 मे रोजी जोतिबा आराखड्याचा निधी वर्ग झाला. मात्र अद्याप अंबाबाई मंदिर आराखड्याचा निधी वर्ग झालेला नाही. निधी मंजूर झाल्यानंतर सर्वच थरातून सरकारचे कौतुक करण्यात आले. अंबाबाई मंदिर परिसरातील विकासकामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. येथील वाहतुकीची कोंडी फुटणार आणि भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शन मिळणार अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या होत्या. वास्तविक शासनाकडून पहिल्या टप्प्यातील सुमारे 900 कोटींचा निधी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करणे अपेक्षित होते. परंतू दीड महिने झाले निधी वर्ग झालेला नाही. निधी वर्ग झाला नसल्याने प्रशासनालाही पुढील प्रक्रिया करता येत नाही.
- भूसंपादन महत्वाचा अडथळा
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यातील निधीमध्ये सर्वाधिक निधी भूसंपादनावर खर्च होणार आहे. त्यामुळे भूसंपादन हा यातील महत्त्वाचा अडथळा आहे. मंदिर परिसरातील मिळकतींचे भूसंपादन करताना रेडीरेकनर दराप्रमाणे भूसंपादन करावे. की त्यांना टीडीआर द्यावा याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे अद्याप निधी वर्ग झालेला नाही. यावर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन याचा निर्णय होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.








