बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे : सुसज्ज बसस्थानकाला मुहूर्त कधी? सेवेत दाखल करण्याची मागणी
बेळगाव : प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी उभारण्यात आलेले सीबीटी बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण इमारतीचे काम पूर्ण होऊनदेखील उद्घाटन रखडले आहे. सुसज्ज बसस्थानकाचे उद्घाटन करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करावे, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांतून होत आहे. प्रवाशांना अत्युत्तम सुविधा पुरविण्यासाठी मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानक हटवून त्याठिकाणी सुसज्ज असे बसस्थानक उभारण्यात आले आहे. त्यापैकी मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन मागीलवर्षी झाले. मात्र सीबीटी बसस्थानकाचे काम रेंगाळले होते. कोरोना आणि इतर अडचणींमुळे काम पूर्ण होण्यास तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला. सद्यस्थितीत अंतिम टप्प्यातील काम हाती घेण्यात आले आहे. या बहुमजली इमारतीमध्ये तळमजल्यात पार्किंग, पहिल्या मजल्यावर कार्यालय आणि दुसऱ्या मजल्यावर प्रवाशांसाठी निवासी खोल्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये फरशी, सजावट आणि इलेक्ट्रिकलची कामे मार्गी लागली आहेत. इमारतीची रंगरंगोटीची कामे पूर्णत्वास आली आहेत. मात्र किरकोळ कामासाठी उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला जात आहे.
सीबीटी बसस्थानकही प्रवाशांच्या सेवेत दाखल करा
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांना सुसज्ज इमारतीची गरज आहे. सध्या मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचा ताण आहे. यासाठी सीबीटी बसस्थानकही प्रवाशांच्या सेवेत दाखल करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही होऊ लागली आहे. सीबीटी बसस्थानकात शहरांतर्गत बससेवेबरोबरच ग्रामीण भागातील बससेवेसाठी फलाट उभारले जाणार आहेत. याठिकाणी यात्री निवास, शौचालय, पाणी, तिकीट काऊंटर, बसपास काऊंटर आदी सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. सर्वसामान्यांना आता पूर्णत्वास आलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागली आहे.
काम पूर्ण होताच उद्घाटन
सीबीटी बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ किरकोळ कामे शिल्लक आहेत. काम पूर्ण होताच हस्तांतर केले जाणार आहे. त्यानंतर इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मध्यंतरी कोरोना आणि इतर अडचणींमुळे कामात व्यत्यय आला होता. लवकरच हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण होईल.
– सईदाबानू बळ्ळारी,(स्मार्ट सिटी एमडी)









