काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव:
महाशनोमहापाप
विद्ध्येनमिही,वैरिणम्…… (गीता तिसरा अध्याय 37 वा श्लोक)
एकदा मी आणि माझी मैत्रीण गाडीवरून स्मशानभूमीच्या दारावरून पुढे जात होतो. ती माझी मैत्रीण माझ्या अंगावर जवळजवळ ओरडलीच. तुला काय एवढाच रस्ता उरला होता का म्हणून सारखे बोलायला लागली. तिला हा रस्ता कधीच यायला आवडत नव्हता. मला मात्र फारसा फरक पडत नव्हता. केव्हातरी घडणारी घटना ही प्रत्येकाच्या आयुष्यातली असते. म्हणून स्मशान टाळून आपला मृत्यू थोडाच टाळता येणार आहे. अशा कितीतरी गोष्टी जगामध्ये असतातच की, ज्या आपण त्या सतत टाळत असतो किंवा टाळाटाळ करत असतो. अगदी लहानपणी जिवाभावाची असलेली मैत्रीण कधीतरी चेष्टा मस्करी करताना आपल्या वर्मावर बोट ठेवून बोलली तर आपण तिला कायमचंच भेटणं, बोलणं टाळतो आणि तो एकच वाईट प्रसंग लक्षात ठेवून आपण इतर सगळ्या चांगल्या गोष्टी अगदी रीतसर विसरतो. मनामध्ये वाईट गोष्ट धरून ठेवतो आणि मग आपल्या लक्षात येतं, आपण कितीतरी चांगले क्षण घालून बसलो. एखादं मूल जन्माने अपंगत्व घेऊन आलेलं असलं तर आई-वडिलांच्या चांगल्या वाईट गुणांनादेखील घेऊन आलेलंच असतं. पण अशावेळी सगळा दोष आईच्याच किंवा डॉक्टरांच्या माथी मारून त्या लोकांना सतत टाळण्याचाच किंवा सोडून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्याला तोंडदेखले चांगलं म्हणणारे नातेवाईक आपण जपतो पण स्पष्ट बोलणारे किंवा सल्ला देणारे नातेवाईक मात्र कसे भोचक आगाऊ आहेत याची चर्चा करतो. आपण ज्या व्यक्तीशी बोलताना तिसऱ्या व्यक्तींबद्दल बोलत असतो तेव्हा आपण तिथून गेल्यानंतर आपल्याबद्दलही बोलणं झालं असणार हे मात्र सपशेल विसरतो. आम्ही आमच्या आयुष्याचा हिशोब मांडायचा ठरवला तर आपण हजारो गोष्टी टाळण्यात निम्मे आयुष्य घालवलेले लक्षात येते. माझ्या भावाने अपमान केला म्हणून मी मरेपर्यंत त्याचं तोंड पाहणार नाही, आई-वडिलांनी अमुक एक गोष्ट माझ्यासाठी केली नाही म्हणून मला ते मेले असं म्हणणारी मंडळी पाहिली की वाटतं या एका प्रसंगाशिवाय या माणसाच्या आयुष्यात दुसरे काही घडलंच नाही का. त्या लोकांनी आपल्यासाठी काढलेल्या खस्ता, अडीअडचणी स्वत:च्या पोटाला चिमटे काढून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं किंवा इतर गोष्टींसाठी धावपळ या सगळ्या गोष्टी आपण विसरतो आणि एकच गोष्ट मनात ठेवतो. या सगळ्यामुळे आपल्याला आज अस्तित्व असतं पण हे सगळं विसरून आपल्याला मिळणारा पैसा मोठेपणा आणि त्याच्याबरोबर आलेला अहंकार इतका मोठा बनतो की या सगळ्या गोष्टी आम्ही नजरेआड करायला लागतो. असे प्रसंग, माणसं, टाळण्याआधी आम्हाला जर शब्द टाळता आले, नजरा टाळता आल्या, भेटीगाठी संपवल्या, त्यांची घरं, नाती,
प्रेम, रुसवे फुगवे आजारपणातील केलेली मदत हे सगळं जाणिवपूर्वक विसरलो की लक्षात येतं, आम्ही बऱ्याच गोष्टी हरवून बसलोय.








