अध्याय पाचवा
बाप्पा म्हणाले, जेथे शासन व्यवस्था उत्तम आहे, धार्मिक सलोखा चांगला आहे, जेथे दगड, आग आणि पाणी ह्यापासून उपद्रव होण्याचा धोका नाही अशा एकांत स्थानी मठ बांधून साधकाने योगसाधना करायला हवी. जेथे गोंगाट होत असेल तेथे मनाची एकाग्रता साधने कठीण जात असते. म्हणून तेथे साधना करू नये. जो दोषयुक्त ठिकाणी योगाभ्यास करेल त्याला तत्काळ स्मृतिलोप, मूकत्व, बधिरता, मन्दता, ताप आणि जडता उत्पन्न होते. जो योगाच्या आठही अंगाचा अभ्यास करतो तो योगाभ्यासी असतो. जो योगाभ्यासात शेवटपर्यंत जातो त्याला योगाभ्यासशालिनी असे म्हणतात. योगाभ्यासशाली मनुष्याने या दोषांचा त्याग करावा. यांकडे लक्ष न दिल्यास स्मृतिलोपादि फल खात्रीने प्राप्त होते. ह्या अर्थाचा एते दोषाऽ परित्याज्या योगाभ्यसनशालिना । अनादरे हि चैतेषां स्मृतिलोपादयो ध्रुवम् ।।11 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ज्याने योगाच्या अभ्यासाला सुरवात केलेली आहे त्याला योगी म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाभ्यासाचे आठ भाग किंवा अंगे आहेत.
समाधी हे योगसाधनेतील शेवटचे अंग किंवा टप्पा आहे. समाधी अवस्था हीसुद्धा एक अनुभूती आहे आणि त्यामुळेच ती वर्णनातीत आहे. मनापेक्षाही सूक्ष्म स्वरूपातील आत्मा हा शरीर व मन यांच्या दुहेरी कवचामध्ये सुरक्षितपणे, अव्यक्त स्वरूपात वास करतो असे मानले जाते. अव्यक्त अतिसूक्ष्म, खोलवर दडी मारून बसलेल्या आत्म्याच्या उन्नतीसाठीच धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन साधने आहेत. आरोग्यप्राप्तीसाठी योगाभ्यास करणाऱ्यांना योगासने, प्राणायाम व ध्यान म्हणजे योगाभ्यास असे वाटते. याच गैरसमजुतीमुळे अनेकदा ते चुकीच्या टप्प्यांवर चुकीच्या पद्धतीने अवलंबिले जातात आणि विनाकारण आपत्तींना आमंत्रण मिळते. प्रत्येक साधकाने जीवनाची योग्य दिशा दाखवणाऱ्या सर्वांगाचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला तर योगाभ्यासातून अपेक्षित व्याधीरहित जीवन आपल्याला जगता येईल. योगाभ्यास करणे प्रत्येक साधकाची मुलभूत गरज आहे. म्हणून बाप्पा योगाभ्यासाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. योगाभ्यासासाठी कोणती ठिकाणं वर्ज्य करावीत हे बाप्पांनी सांगितलं. जर असं न करता चुकीच्या जागी साधना केली तर स्मृतिलोप, मूकता, बधिरपणा, ताप आदि व्याधी त्रस्त करतात हेही बाप्पा सांगतात. म्हणून साधकाने काळजीपूर्वक स्थानाची निवड करावी. पुढे सांगतात की, साधकाने आहार, निद्रा याबाबतीतही दक्ष असायला हवं.
नातिभुञ्जन्सदा योगी नाभुञ्जन्नातिनिद्रितऽ ।
नातिजाग्रत्सिद्धिमेति भूप योगं सदाभ्यसन् ।। 12 ।।
हे भूपा, कधीही अतिशय न खाणारा, अगदी कमी न खाणारा, अति निद्रा न घेणारा, अति जागरण न करणारा व नेहमी योगाभ्यास करणारा योगी सिद्धि पावतो. अति सर्वत्र वर्जयेत अशी आपल्याकडे म्हण असून ती योगाभ्यासाच्या बाबतीतही लागू पडते. साधकाने हलका आहार घ्यावा. पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत. पचायला कठीण पदार्थ खाल्ल्यास जडत्व येऊन अंगात आळस भरतो. साधारणपणे योग्याने पोटाचे चार भाग कल्पून त्यातील दोन भाग भरेल एव्हढेच ताजे अन्न खावे. तिखट, तेलकट, फार आंबट किंवा कडू पदार्थ टाळावेत. चवीढवीच्या पदार्थांची कास सोडावी. पोटाच्या उर्वरित दोन भागांपैकी एक भाग पाणी प्यावे व एक भाग वायूंच्या हालचालींसाठी मोकळा ठेवावा. तसेच योग्य प्रमाणात झोप घ्यावी. योगाभ्यास करून साधायचं मूळ उद्दिष्ट सतत डोळ्यापुढे ठेवावे व मनाला नीट समजावून सांगावे. एखादं मोठं उद्दिष्ट डोळ्यापुढे असलं की, मनुष्य आपोआप लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याप्रमाणे साधक आपणहूनच जीवनातल्या मोहात पाडणाऱ्या गोष्टींकडे डोळेझाक करतो.
क्रमश:








