अमेरिकन इतिहासातील बँक बुडण्याची दुसरी मोठी घटना
आता फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ताब्यात घेणार , तोटा व निधीच्या अभावामुळे शेअर्समध्ये 60 टक्के घसरण
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक अशी ओळख असणारी ‘सिलिकॉन व्हॅली बँके’ला (एसव्हीबी) नियामकांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने हा आदेश जारी केला आहे. याचे परिणाम भारतावरही काही प्रमाणात होतील, असा दावा केला जात आहे. 2008 च्या आर्थिक मंदीनंतर अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पडझड मानली जात आहे.
बँकेच्या मूळ कंपनी एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे शेअर्स 9 मार्च रोजी जवळपास 60 टक्क्यांनी घसरले. त्यानंतर बँकेचे व्यवहार बंद करण्यात आले. ‘एसव्हीबी’च्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गेल्या 2 दिवसांत यूएस बँकांचे शेअर बाजारात 100 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तसेच युरोपियन बँकांना 50 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एफडीआयसी) शुक्रवारी सिलिकॉन व्हॅली बँक ताब्यात घेण्याची घोषणा केली. यासोबतच ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आता 13 मार्च रोजी उघडल्यानंतर सर्व विमाधारक ठेवीदारांना काही प्रमाणात त्यांच्या ठेवी काढण्याचे स्वातंत्र्य असेल. केवळ 2.5 कोटी ऊपयांपर्यंतच्या ठेवी परत केल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेकडे 2021 मध्ये 189 अब्ज डॉलर्सच्या ठेवी होत्या. सिलिकॉन व्हॅली बँकेने गेल्या 2 वर्षांत आपल्या ग्राहकांच्या पैशाने अनेक अब्ज डॉलर्सचे रोखे खरेदी केले होते, परंतु कमी व्याजदरामुळे या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळाला नाही. वाढत्या व्याजदरामुळे टेक कंपन्यांमधील गुंतवणूक कमी झाली. तसेच निधी न मिळाल्याने कंपन्यांनीही आपले उर्वरित पैसे बँकेतून काढण्यास सुऊवात केली. वारंवार पैसे काढल्यामुळे बँकेला आपली मालमत्ता विकावी लागली.
भारतीय कंपन्यांनाही फटका शक्य
‘सिलिकॉन व्हॅली बँक’ बंद झाल्यामुळे अनेक भारतीय स्टार्टअपवरही परिणाम होणार आहे. ‘एसव्हीबी’ने भारतातील सुमारे 21 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ‘एसव्हीबी’ची भारतातील सर्वात लक्षणीय गुंतवणूक ‘एसएएएस-युनिकॉर्न आयसर्टिस’मध्ये आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ‘एसव्हीबी’ने या कंपनीमध्ये सुमारे 150 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक केली. याशिवाय ब्ल्यूस्टोन, पेटीएम, वन97 कम्युनिकेशन्स, पेटीएम मॉल, नापतोल, कारवाले, इनमोबि आणि लॉयल्टी रिवार्ड्ज सारख्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.








