वाल्मिकी समाजाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मागास वर्गातील तळवार समुदायाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरकारच्या सुविधा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वाल्मिकी समाजावर अन्याय होत आहे. तळवार समुदायाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्ह्यातील वाल्मिकी समाजाने केली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. कर्नाटक राज्याशी संबंधित अनुसूचित जमातीमध्ये नायक, नायकड, चोळ, नायकर कपाडीया, नायक ओटा, नायक नाना, नाईक, बेड, बेडर व वाल्मिकी यासह तळवार या जमातींना अनुसूचित जमातीसाठी असलेल्या सरकारी सुविधांचा विस्तार केला आहे. या संबंधीचा आदेश समाज कल्याण खात्याने पाच वर्षांपूर्वीच बजावला आहे.
मात्र तळवार व या समुदायाशी संलग्न असलेल्या जातींनी नायक, वाल्मिकी, बेड, बेडर यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापैकी काहीजण जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून सरकारच्या सुविधा मिळवित आहेत. त्यामुळे वाल्मिकी समाजावर अन्याय होत आहे. मागास वर्गाशी संबंधित असलेल्या तळवार समुदायाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असा आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन करून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ही प्रमाणपत्रे रद्द करून खोटी प्रमाणपत्रे वितरण केलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना राजशेखर तळवार, दिनेश बागडे, पांडुरंग नायक आदी उपस्थित होते.









