जिल्हा आरोग्य खात्याची कारवाई, कारणे दाखवा नोटीस, सीमावासियांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागातील 865 गावांमधील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी म. ए. समितीकडून सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्रांना जिल्हा आरोग्य खात्याकडून कारणे दाखवा नोटीस बजावून टाळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे सीमावासियांतून प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणी यांच्या नेतृत्वामध्ये तालुका आरोग्याधिकारी संजय डुमगोळ, इतर अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत शहरातील चार केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर, रामलिंगखिंड गल्ली, शहापूर व वडगाव येथील केंद्रांना नोटीस बजावून टाळे ठोकण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील गोरगरीब जनतेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गंभीर स्वरुपाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. ही मदत गोरगरीब नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी शहरासह सीमाभागातील इतर तालुक्यांमधील नागरिकांना आरोग्य योजनेचा लाभ करून देण्यासाठी शहरामध्ये चार केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र या योजनेला कन्नड संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. यावरून आरोग्याधिकारी महेश कोणी व इतर अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावून टाळे ठोकले आहेत.
कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गोरगरिबांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे. कर्नाटक सरकारला अशी योजना राबविण्याची कुवत नाही. गोरगरिबांसाठी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या योजनेवर आक्षेप घेतल्याने नागरिकांतून सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी 24 तासांत आरोग्य खात्याकडे माहिती पाठवावी, असेही जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कोणी यांनी सांगितले आहे.
अर्ज केलेल्यांची यादी देण्याबाबत नोटीस
शहरातील चार केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावून टाळे ठोकण्यात आले आहेत. कोणत्या कायद्यांतर्गत सदर योजना चालविली जात आहे, योजनेसाठी अर्ज केलेल्यांची यादी देण्यात यावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी सांगितले.









