कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांचे आवाहन : युरियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
युरियाच्या वापराने मानवी आरोग्यावर, मातीची सुपिकता संपुष्टात येऊन जमीन नापीक बनते. युरियाच्या अति वापरामुळे पिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतात. यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून रसायनमुक्त पीक घेण्याकडे वळावे, जेणेकरून मानवी आरोग्यासह शेतजमीनही सुरक्षित राहते. सेंद्रिय शेती अंगिकारल्यास कमी खर्चात अधिक व पोषक पीक घेता येते. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी केले.
युरिया पिकांसाठी नायट्रोजन एक अतिशय उपयुक्त स्रोत असला तरी त्याचा अतिवापर जमिनीतील सुपिकता, जलप्रदूषणात वाढ होऊ शकते. मागणीपेक्षा युरियाचा जास्त वापर केल्यास पिकांवर परिणाम होऊन उत्पादनही कमी होऊ शकते. जमिनीतील पोषक तत्त्वांचे असंतुलन होऊ शकते. उच्च नायट्रोजन पातळी पिकांसाठी विषारी असू शकते. परिणामी पिके किडे व रोगांना बळी पडल्याने उत्पादन खर्चही वाढतो. यामुळे शेतकऱ्यांना रसायन खतांचा अतिवापर न करता सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जमिनीचा पोत कमी होतो
युरियाचा अतिरेक केल्यास पिकविलेल्या भाज्या, फळे आणि अन्नधान्यांमध्ये नायटेट्स आणि नायटेट पदार्थांचे प्रमाण वाढते. जर याचे जास्त काळ सेवन केल्यास ते मानवांसाठी विषारी ठरू शकते. परिणामी पोटदुखी, उलट्या आदी समस्या होऊ शकतात. जर शरीरात नायटेट्सचे प्रमाण वाढल्यास त्याचे नायट्रोसामाईनमध्ये रुपांतरित होऊन कर्करोगाचा धोकाही उद्भवू शकतो. लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोमची समस्याही उद्भवू शकते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. जर युरिया शेतातील पाण्याच्या माध्यमातून भूजल, नद्या आणि तलावांमध्ये गेल्यास पिण्याच्या पाण्यातही नायट्रेट्सचे प्रमाण वाढून हे मानवी आरोग्यासाठी खूप हानिकारक बनू शकते. तसेच युरियाचा सतत आणि जास्त वापर केल्याने जमिनीचा पोत कमी होतो. यामुळे जमीन क्षारपड बनते.
नॅनो युरियाचा वापर करावा
नॅनो युरिया हे द्रव खत आहे. ते इफ्कोने विकसित केले असून ते पारंपरिक युरिया खतापेक्षा आठ ते दहा पट अधिक प्रभावी आहे. तसेच नॅनो युरिया पिकांना जलद पोषक तत्त्वे प्रदान करते. जर नॅनो युरियाचा वापर केल्यास पारंपरिक युरियाचा वापर 50 टक्क्मयांनी कमी करता येऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय व नॅनो युरियाचा वापर करून पिके घ्यावीत.
आरोग्याचाही विचार करावा
सध्या राज्यात युरियाचा तुटवडा भासत असून शेतकरीही युरियाचा पुरवठा करण्याची मागणी राज्य सरकारकडे करत आहेत. पण केंद्र सरकारकडून मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांना खतांविना समस्या होऊ नयेत, यासाठी कृषी खात्याकडून पर्यायी मार्ग सुचविण्यात येत आहेत. हे करत असताना शेजमिनीसह मानवी आरोग्याचाही विचार करून युरियाचा अतिवापर टाळण्याचेही आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे, असे कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी सांगितले.
जैव खते वापरा
शेतकऱ्यांनी युरिया वापरताना काळजी घ्यावी. रासायनिक खतांच्या वापरात संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. नायट्रोजनसोबतच फॉस्फरस आणि पोटॅशियमसारख्या प्रमुख पोषक घटकांचादेखील समावेश असावा. सेंद्रिय शेती करताना शेणखत, गांडूळ खत, सेंद्रिय खत, सेंद्रिय पदार्थ आणि जैव खतांसारखे पर्यायी स्रोत अधिक वापरल्याने युरियावरील अवलंबित्व कमी होणार आहे. यामुळे मातीचे आरोग्य सुधारून जमिनीची सुपिकता राखण्यास मदत होते. परिणामी निरोगी पिके उपलब्ध होऊन मानवी आरोग्य चांगले राहते.









