नीरज चोप्राही जेतेपदासाठी सज्ज : जगभरातील दिग्गज अॅथलिट होणार सहभागी
वृत्तसंस्था/ ब्रुसेल्स
भारताचा धावपटू अविनाश साबळे पहिल्यांदाच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. या लीगच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो नीरज चोप्रानंतर दुसरा भारतीय ठरला आहे. 29 वर्षांचा अविनाश 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारतीय आव्हान सादर करेल. साबळेने या मोसमात 5 पैकी 2 डायमंड लीग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि तो 3 गुणांसह 14 व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, गुणतालिकेत वरील क्रमांकावर असलेल्या 4 खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली. यासह साबळे अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. याशिवाय, स्टार भालाफेकपटू नीरज या मोसमाच्या अंतिम फेरीसाठी आधीच पात्र ठरला आहे.
दोन दिवस चालणारी डायमंड लीगची अंतिम फेरीत बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे होणार आहे. 13 व 14 सप्टेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत जगभरातील दिग्गज अॅथलेटिक्स आपले नशीब आजमावतील. भालाफेकपटू नीरज चोप्रा व धावपटू अविनाश साबळे यांच्यावर भारताची मदार असणार आहे. नीरजचा सामना 14 तारखेला होणार आहे. जिथे एकूण 6 खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेत नीरजची नजर 90 मीटरच्या विक्रमावर आहे, जो तो बऱ्याच दिवसांपासून मोडण्याचा प्रयत्न करत आहे.
अविनाश साबळेला इतिहास रचण्याची संधी
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे हा देखील या डायमंड लीग फायनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. साबळे 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सहभागी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये साबळेने 11 वे आणि पोलंडमधील अलीकडील सिलेसिया डायमंड लीगमध्ये 14 वे स्थान मिळवले आहे. ब्रुसेल्स येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी तो पात्र ठरला असून या स्पर्धेत विजय मिळवण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल. त्याची स्पर्धा 13 सप्टेंबरला होईल.
जेतेपदासाठी नीरज सज्ज
डबल ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा या मोसमाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याने लुसाने आणि दोहा डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान मिळवून चमकदार कामगिरी केली. लुसानेमध्ये त्याची सर्वोत्तम थ्रो 89.49 मीटर होती, तर दोहामध्ये त्याने 88.36 मीटर फेक केली. मात्र, नीरजचे 90 मीटरचे अंतर पार करण्याचे स्वप्न आहे, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. स्टॉकहोम डायमंड लीग 2022 मध्ये नीरजने 89.94 मीटर ही त्याची सर्वोत्तम थ्रो केली होती आणि यावेळी त्याच्याकडे 90 मीटरचा आकडा गाठण्याची सुवर्ण संधी आहे. यावर्षी केवळ एकाच डायमंड लीगमध्ये सहभागी झालेला पाकिस्तानचा अर्शद नदीम अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे नीरज आणि अर्शद यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना या लीगमध्ये होणार नाही. अर्थात, त्याच्यासमोर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स व जर्मनीच्या ज्युलियन वेबरचे कडवे आव्हन असेल.









