कोल्हापूर / विद्याधर पिंपळे
उजळाईवाडी विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. या विमानतळामुळे कोल्हापूरच्या औद्योगिक, शेती व व्यापारी क्षेत्राचा विकास होणार आहे. त्याच बरोबर लवकरच विमानतळावर रात्रदिवस (लँडलाईन) विमानसेवा सुरु होणार असल्याने, या विमानसेवेसाठी आवश्यक असणाऱया इंधनासाठी सुध्दा खास सोय उजळाईवाडी परिसरात सुरू होत आहे. विमाना साठी लागणाऱया एव्हिएशन टरबाइन फ्युयलसाठी, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडने भाडेतत्त्वावर एव्हिएशन फ्युलिंग स्टेशन (एएफएस) उभारणीची घोषणा केली. या स्टेशननासाठी 10 वर्षाच्या भाडे तत्वावर जागा घेण्यासाठी जाहीरातही तात्काळ काढण्यात आली आहे. यामुळे वाढणाऱया विमानसेवेसाठी आता विमान इंधनाची गैरसोय दूर होणार आहे.
कोल्हापूर उजळाईवाडी विमान सेवा विकसित करण्यासाठी नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने लक्ष घातले आहे. नुकतेच उजळाईवाडी विमानतळाला नाईट लँडिंगची मान्यता दिली. तसेच धावपट्टीच्या विस्तारीकरणाला ही मान्यता दिली आहे. 1370 मीटर वरून 1930 मीटर धावपट्टी विस्तारित करण्याची मंजुरी दिली आहे. यामुळे एअर बस सारखी मोठी विमाने व रात्रीची विमानसेवा सुरळीत होणार आहे. नाईट लँडिंग साठी अंडरग्राउंड केबलसाठी निधीही जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात या विमानतळावरून सुमारे साडे तीन लाख प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.
सध्या कोल्हापूर उजळाईवाडी विमानतळावरून कोल्हापूर – हैदराबाद -कोल्हापूर, तिरूपती -कोल्हापूर या मार्गावर इंडिगो व अलाईन्स एअरलाईन्सची विमान सेवा सुरू आहे. या मार्गावर दैनंदिन आठ विमानंचे ये-जा सुरू आहे. सध्या बेंगलोर मार्गावरील विमानसेवा बंद असून, यासह लवकरच कोल्हापूर- मुंबई ही विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दिवस रात्र येणाऱया विमानासाठी इंधनाची मोठी गरज होती. ही गरज आता भारत पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेडने पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विमानतळ परिसरात विमानाच्या इंधनासाठी जागा घेण्यासाठी बुधवारी जाहिरात काढण्यात आली. यापूर्वी कोल्हापुरात विमानाचे इंधन भरण्याची कोणतीच सोय नसल्याने , टँकर मागवला जात होता. सध्याही टँकर सेवा बंद असल्याचे सांगण्यात येते.
कोल्हापूरच्या इंधन सेवेसाठी 30 मीटर बाय 30 मीटर अशी जागेची गरज असून त्यासाठी त्यांनी जाहिरात काढलेली आहे. 16 ऑगस्ट नंतर या निविदा फोडण्यात येणार आहे. विमानाचे इंधन हे शुद्ध असते.यासाठी अमेरिकेच्या संस्थेमार्फत या इंधनाचे मानक ठरवले जाते. या इंधनाचे विशिष्ट तापमान लागते.यामध्ये पाण्याचा अंश असू नये त्यामुळे हे पाणी बर्फ होऊन विमानसेवेला अपघात होऊ शकतो.सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पेट्रोल पेक्षा विमानाचे इंधनाचा दर निम्मा आहे.