वृत्तसंस्था/ झाग्रेब
भारतीय दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंदने ग्रँड चेस टूरचा एक भाग असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मध्यम कामगिरीची नोंद केली. त्याने एक सामना जिंकला, एक बरोबरीत सोडविला आणि एका सामन्यात त्याला पराभवाला तोंड द्यावे लागले. आनंदने दिवसाची सुरुवात चांगली केली. आनंदने इव्हान सारिकला चौथ्या फेरीत पराभूत केले, तर फॅबियानो काऊआनाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून मात्र त्याला पराभव पत्करावा लागला.
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश याने अपेक्षेनुरुप सुरुवात करता न आल्यानंतर दोन सामने जिंकून आणि एक बरोबरीत सोडवून संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर पोहोचण्यात यश मिळविले. दिवसाच्या पहिल्या सामन्यात त्याने रिचर्ड रॅपोर्टसोबत बरोबरी साधली. त्यानंतर गुकेशने प्रभावी खेळाचे दर्शन घडवत कॉन्स्टेन्टिन लुपुलेस्कू आणि सारिकचा पराभव केला. .
दुसऱ्या दिवशी इयान नेपोम्नियाची आणि काऊआना यांना आनंदच्या समकक्ष स्थान मिळविण्यात यश आले. तिघांचेही आता आठ गुण झाले आहेत आणि प्रत्येकी सात गुणांसह गुकेश आणि जॅन-क्रिझिस्टोफ डुडा (पोलंड) दुसऱ्या स्थानावर आहेत. रॅपिड बुद्धिबळाच्या शेवटच्या दिवशी आघाडीवर पोहोचताना नेपोम्नियाचीने तिन्ही सामने जिंकले.
कार्लसनसाठी दिवसाची सुऊवात धक्क्याने झाली. कारण त्याला काऊआना आणि फिरोज्जा यांच्याविरुद्धचा सामना गमवावा लागला. तथापि, पाच वेळच्या जागतिक बुद्धिबळ विजेत्याने शेवटच्या फेरीत पुनरागमन करताना आनंदविऊद्ध तांत्रिक विजय मिळवला. आता रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेनंतर ब्लिट्झ स्पर्धा होणार असून त्यात कार्लसन, आनंद आणि नेपोमनियाची यांच्यासह आघाडीचे खेळाडू सहभागी होणार आहेत.









