चौदा दिवसात विक्रमी 39 इंच पाऊस : वादळी वाऱ्यामुळे झाडांची, घरांची पडझड : वाहिन्या तुटल्याने वीज खात्याचे नुकसान : रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत
विशेष प्रतिनिधी / पणजी
गेल्या 14 दिवसांमध्ये धुवाँधार कोसळलेल्या पावसाने अखेर इंचांची वार्षिक सरासरी पार केली आहे. राज्यात आतापर्यंत 47 इंच पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा तीन इंचाने तो जास्त झाला. काल गुऊवारी रेड अलर्ट असला तरी अवघ्या काही ठिकाणीच मुसळधार पाऊस झाला. तर गुरुवारी दिवसभरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गोवा सरकारने घाईघाईनेच जाहीर केलेली शैक्षणिक सुट्टी वाया गेली. आज राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी वादळीवाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. वीज खात्याचेही बरेच नुकसान झाले. विविध भागात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली.
राज्यात अखेर पावसाने विक्रमी नोंद केली. अवघ्या 14 दिवसांमध्ये पावसाने विक्रमच केला. गेल्या 14 दिवसांमध्ये 39 इंच पाऊस झाला. म्हणजे सरासरी दिवसाकाठी 2.78 इंच एवढा पाऊस झाला. आतापर्यंत एकूण पाऊस 47 इंच दि. 23 जूनपर्यंत राज्यात 204 मि.मी. म्हणजे 8 इंच एवढा पाऊस झाला होता. काल गुऊवारपर्यंत 1192 मि.मी. आणि 988 मि.मी. ही नोंद केवळ या 14 दिवसांमध्ये झाली आहे. सरासरीच्या तुलनेत 3 इंच अतिरिक्त पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरी पाहता एव्हाना 44 इंच पाऊस पडतो. पावसाने अवघ्या दोन आठवड्यात सारी तूट भऊन काढून अतिरिक्त तीन इंचांची नोंद केली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण पाऊस 47 इंच झाला आहे.
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमी पाऊस
पणजी वेधशाळेने संपूर्ण गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा व रेड अलर्ट घोषित केले होते. रेड अलर्ट हे अत्यंत आणीबाणीच्या वेळी म्हणजेच चक्रीवादळ वगैरेच्या काळात वापरले जाते. गोव्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वारे वाहतील या भीतीने गोवा सरकारने शैक्षणिक पातळीसह सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. प्रत्यक्षात मात्र बुधवारच्या तुलनेत गुरुवारी फारच कमी पाऊस झाला. पणजीत दुपारी 3.20 च्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. सकाळपासून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडून गेल्या.
मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने आज शुक्रवारीही मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. आज संपूर्ण गोव्याला पाऊस झोडपून काढणार आहे. त्या अनुषंगाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. उद्यापासून पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल, मात्र दि. 9 व दि. 10 जुलै रोजी जोरदार पाऊस पडेल, असे कळविले आहे. आज वादळी वाऱ्याचा वेग ताशी 65 किमीपर्यंत राहील असे म्हटले आहे. समुद्र खवळलेला राहील व त्यामुळेच लाटांची उंची दोन ते अडीज मीटर्सपर्यंत जाईल. गेल्या 24 तासांत राज्यात समाधानकारक पाऊस झाला. पणजीत तब्बल 6 इंच तर काणकोणमध्ये 7 इंच पावसाची नोंद झाली. ज्या सांखळी व वाळपई भागात सर्वाधिक पाऊस होत असे त्या भागात यंदा आतापर्यंत सर्वात कमी पाऊस पडलेला आहे.
नद्या, नाले तुडूंब, धरणात वाढले पाणी
गेल्या 14 दिवसांच्या पावसाने राज्यातील नद्या, नाले तुडूंब भऊन वाहत आहेत. सर्वत्रच जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधील पाणी साठ्यात नेत्रदीपक वाढ झाली आहे. धरणांमधील पाण्याची पातळीही वाढत आहे. गुरुवारी रेड अलर्ट जाहीर केल्यानुसार मुसळधार पाऊस पडला असता तर अनेक ठिकाणी पूर आले असते.
पावसामुळे संपूर्ण गोवाभर गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले. वीज खांबांवर झाडे पडल्याने वीज खात्याचे बरेच नुकसान झाले. दक्षिण गोव्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. म्हापसा परिसरातील गिरीमधील शेत पाण्याखाली गेले व पणजी म्हापसा रस्त्यावर गुडघाभर पाणी आले. त्यामुळे वाहतुकीत व्यत्यय आला.









