वयाच्या 10 व्या वर्षी ‘कावडयात्रा’
उत्तर भारतात सध्या श्रावण महिना सुरु आहे. हा भगवान शिवशंकरांचा मास मानला जातो. उत्तर भारतातील दशकोट्यावधी शिवभक्त या महिन्यात शिवचरणी लीन होतात. त्यांचे सण आणि उत्सव उत्साहात आणि भक्तीभावाने साजरे करतात. याच मासात पवित्र गंगा नदीचे जल कावडीतून आपल्या गावी घेऊन जाण्याचा सोहळा केला जातो. देशभरातून गंगादर्शनासाठी हरिद्वार येथे आलेले शिवभक्त गंगातीर्थाने भरलेल्या कावडी आपल्या खांद्यांवरुन वाहून नेतात. अर्थातच, ही शिवभक्ती करणारे हे भाविक वयाने 30 वर्षे किंवा त्याच्याही पुढचे, म्हणजेच मोठ्या वयाचे असतात. पण ज्या वयात अध्यात्म, देवभक्ती यांची पुरेशी कल्पनाही आलेली नसते आणि जे वय दंगा करण्याचे आणि खेळण्याचे असते त्या वयातील एक बालक कावडीतून गंगा वाहून नेत आहे. तो सध्या देशात चर्चेचा विषय बनला असून त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध होत आहेत. त्याचे नाव हेमंत असे आहे. तो मूळचा होडल येथील निवासी आहे. त्याने या वर्षीच्या कावड उत्सवात भाग घेतला आहे. हरिद्वारहून तो आपल्या गावी, अर्थात होडल या गावी कावडीतून गंगा नदीचे तीर्थ खांद्यावरुन वाहून नेत आहे. इतक्या लहान वयात त्याने स्वत:हून त्याने हा निर्धार केला असून त्याचे कौतुक होत आहे. सध्या खरेतर उत्तर भारतात अतिवृष्टी आणि पूर यामुळे परिस्थिती कावड यात्रेसाठी अनुकूल नाही. तरीही धाडसाने आणि निर्धाराने अनेक कावड यात्री आपला पण पुरा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात हेमंतचाही समावेश आहे. त्याची ही भक्ती प्रेरणादायी असून तिचे अनुकरण केले पाहिजे, अशी भलावण अनेक शिवभक्त आणि भाविकांकडून होत आहे.
सापांची बाग
बाग किंवा बगीचा म्हटले की, विविध प्रकारची आकर्षक फुलझाडे, विभिन्न प्रकारची झाले आणि इतर वनस्पतींनी भरलेले स्थान आपल्या डोळ्यांसमोर येणार हे निश्चित आहे. अशा बागांमधून किंवा रोपवाटिकांमधून लोक वैविध्यपूर्ण फुलझाले किंवा फळझाले, भाजीपाल्याच्या बिया आपल्या घरी घेऊन जातात. अशा वनस्पतींची शेती अशा बागांमध्ये किंवा रोपवाटिकांमध्ये होत असते. अशा प्रकारचे बगीचे आपल्या देशात अनेक आहेत. पण जगात एक देश असाही आहे की जेथे ‘सापां’ची शेती होत असलेले बगीचे आहेत, असे सांगितल्यास आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या देशाचे नाव व्हिएतनाम असे आहे. या उद्यानातातील झाडांवर फळे किंवा फुले नव्हेत, तर साप लटकलेले असतात. 400 हून अधिक प्रकारचे साप वळवळत असलेली ही झाले पाहतानाही जीवाचा थरकाप होतो, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हे स्थान डॉग अँड स्नेक फार्म म्हणून ओळखले जाते. येथील सर्व साप विषारी आहेत. केवळ सापच नव्हे, तर येथे औषधी वनस्पतींचीही लागवड गेली जाते. तसेच विविध प्रकारच्या रानभाज्याही उत्पादित केल्या जातात. गेल्या तीन चार वर्षांपर्यंत हे सर्पोद्यान तसे अज्ञातच होते. त्याची विशेष प्रसिद्धी झाली नव्हती. पण आता सोशल मिडियावर त्याला प्रसिद्धी मिळताच ते चर्चेचा विषय बनले आहे.
चाळीसवर अडकले वय

माणसाचे वय वाढूच नये आणि वाढलेच तरी त्याचे तारुण्य कमी होऊ नये, यासाठी जगात आज कोट्यावधी डॉलर्स खर्च करुन जोरदार संशोधन होत आहे. कोणी तरुणांचे रक्त आपल्या शरिरात टोचून घेत आहेत तर कोणी वयस्कर होत जाणाऱ्या पेशींना नवतारुण्य मिळवून देण्यासाठी औषधे शोधत आहेत. आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी अशा विविध उपचार पद्धतींमध्ये अशी औषधे असल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात वयाची साठी गाठूनही पूर्ण निरोगीपणा आणि तारुण्यातील शक्ती टिकवून धरलेली व्यक्ती केवळ विरळाच असते. तथापि, डॉक्टर मार्ग हायमन ही व्यक्ती याला अपवाद आहे. ते व्यवसायाने आयुष्यवर्धन विषेशज्ञ डॉक्टर आहेत. त्यांचे वय आज 63 वर्षे आहे. मात्र, त्यांनी 40 वर्षाच्या व्यक्तीचा जोष आजही टिकवून धरला आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर, त्यांचे वय गेली 23 वर्षे 40 वरच अडकले आहे. ते वाढतच नाही. त्यांच्या पेशी आणि इतर अवयवांची क्षमता 40 वर्षे वयाच्या निरोगी माणसाइतकी ताजीतवानी आहे. मात्र, हा कोणताही चमत्कार नाही. यामागे त्यांचे प्रयत्न आहेत. ते प्रतिदिन सकाळी 6 वाजता उठतात. 20 मिनिटे ध्यानधारणा करतात. नंतर काळी कॉफी पितात. थोडावेळ काम करतात. नंतर अर्धा तास स्नायूंची शक्ती वाढविणारे व्यायाम करतात. स्टीम शॉवर आणि पाठोपाठ थंड शॉवर घेतात. प्रोटीनयुक्त ब्ल्यूबेरीज, जुकीनी आणि चियाच्या बियांचा शेक पितात. जेवणात आरोग्यवर्धन स्निग्ध पदार्थांचा समावेश करतात. तणावापासून मुक्त राहतात. अशा प्रकारे एक आदर्श जीवनशैली स्वीकारुन त्यांनी स्वत:चे वय तटवले आहे.
कोट्याधीश भिकारी
आपण काय घडणार आहोत आणि दुसऱ्याला काय देणार आहोत, हे सर्वस्वी आपल्याच हाती असते, असे अनेकांचे मत आहे. काही लोकांना दुसऱ्याला जास्तीत जास्त देण्यात आनंद मिळत असतो. तर काहीजण असेही असतात की, त्यांना नेहमी दुसऱ्याकडे काही ना काही मागण्यातच समाधान वाटत असते. तर काहीवेळा असेही घडते की आपण ज्याला दयाबुद्धीने काही दान करत असतो, तो आपल्यापेक्षाही बराच श्रीमंत असतो. तरीही आपल्याकडून घेत असतो. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात एक भिकारी आहे. त्याच्याकडे साडेसात कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच मुंबईत असे लक्षावधी लोक आहेत की ज्यांना प्रतिदिन 400 ते 500 रुपये मिळविण्यासाठी दिवसभर हाडाची काडे करावी लागतात. पण या भिकाऱ्याचा दीड कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. दोन दुकाने आहेत. त्यांचे त्याला महिन्याला 60 हजार रुपये भाडे मिळते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्यांकडेही इतकी संपत्ती असत नाही. या भिकाऱ्याचे नाव भारत जैन असे आहे. तो मुळीच शिकलेला नाही. भीक मागणे हाच त्याचा बालपणापासूनचा व्यवसाय आहे. तो शिकलेला नसला तरी त्याची अपत्ये कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेली आहेत. ती मोठ्या पदांवर आहेत आणि त्यांचीही सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. त्याने भीक मागणे सोडावे, असा त्याच्या मुलांचा आग्रह आहे. पण ज्या व्यवसायामुळे ही श्रीमंती आपण कमावली, तो सोडणे कृतघ्नपणा असल्याचे तो मानतो. भिकेतून मिळालेल्या रकमेची योग्य प्रकारे गुंतवणूक केल्याने आपण इतके श्रीमंत झालो असा त्याचा दावा आहे. अनेक श्रीमंतांनाही त्याचा हेवा वाटल्याशिवाय रहात नाही. आठ वर्षांपूर्वी त्याची माहिती एका प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. आजही तो भीक मागत आहे आणि आपल्या संपत्तीत वाढ करीत आहे. तसे पाहू गेल्यास मुंबई शहरात भिकारी असंख्य आहेत. पण नाईलाजास्तव करावा लागणारे हे कृत्य इतके धन मिळवून देऊ शकते, हे अविश्वसनीय आहे.
पाणी पिणे बेतले जीवावर
पाणी हे जीवन आहे, असे म्हणण्याची पद्धत आहे. अर्थ असा की पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. अन्नाशिवाय एकवेळी काही दिवस काढता येतील, पण पाणी प्यायल्याशिवाय तीन दिवस सुद्धा निभावू शकत नाहीत, असे तज्ञ म्हणतात. पण पाणी पिण्यामुळे मृत्यू होण्यापर्यंत वेळ येऊ शकते, हे अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे. पण अमेरिकेत नुकतीच अशी एक घटना घडली आहे. 10 वर्षांचा मुलगा रे जॉर्डन आपल्या परिवारासह साऊथ कॅरोलिना या प्रांतात राहतो. 4 जुलैला तो आपल्या घरात आपल्या च्लुत भावंडांसह खेळत होता. अचानक त्याला खूप उकडायला लागले. त्यामुळे त्याने बाटलीतील पाणी पिण्यास प्रारंभ केला. पण त्याचे समाधान होईना. त्याने अवघ्या एका तासात सहा बाटल्या पाणी संपविले. त्यानंतर त्वरित त्याची प्रकृती बिघडली. त्याचा श्वास कोंडू लागला. उचक्या येऊ लागल्या. त्याच्या पोटात असह्या वेदनाही होऊ लागल्या. काही वेळाने तो बेशुद्ध पडला. त्याच्या आईची चांगलीच तारांबळ उडाली. त्वरित त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तातडीच्या चाचण्या करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात पाणी पोटात गेल्याने त्याच्या शरिरातील सोडियमचे प्रमाण घसरले होते. इतक्या प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे त्याची मूत्रपिंडे तितके पाणी शरिराबाहेर काढू शकत नव्हती. त्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. अखेरीस अनेक उपाय करुन कसाबसा त्याचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. तात्पर्य असे की, जीवनावश्यक पाणीही अतिरेक झाल्यास जीवावर बेतू शकते.









