आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आवाहन : पिसुर्ले भव्य आरोग्य शिबिरामध्ये 592 जणांची तपासणी
वाळपई : ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या भव्य आरोग्य शिबिरातून ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी करण्याची संधी उपलब्ध होत असते. यातून त्यांना चांगला फायदा होत असतो. यामुळे अशा आरोग्य शिबिरातून गावातील सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. पिसुर्ले पंचायत क्षेत्रासाठी आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्ये मतदारसंघ आमदार डॉ. देविया राणे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, सरपंच देवानंद परब, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, वाळपई सामाजिक ऊग्णालयाचे डॉ. श्याम काणकोणकर, इतर पंच सदस्यांची उपस्थिती होती.
गोव्याच्या आरोग्य क्षेत्रामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. यामुळे आज गोवा मेडिकल कॉलेजच्या कारभारावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. दर दिवशी गोमेकॉत उपचारासाठी ऊग्णांची संख्या वाढत आहे. यापूर्वी सर्वसामान्य व्यतिरिक्त कोणीही तेथे उपचार घेत नव्हते. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गोव्यातील नागरिक खाजगी ऊग्णालयात तपासणी करण्याऐवजी गोमेकॉत उपचारासाठी जात असल्याचे मंत्री राणे म्हणाले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, सत्तरी तालुक्यातील प्रत्येक पंचायत क्षेत्रामध्ये अशा स्वतंत्र मेडिकल कॅम्पचे आयोजन केले आहे. आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतलेली आहे, असे आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले. सरपंच देवानंद परब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छतागृही म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या रसिका खांडेपारकर यांचा आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार डॉ. देविया राणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना मंत्री राणे यांनी आपल्या ट्रस्टतर्फे 50 हजारांचे मानधन देणार असल्याचे घोषित केले. सूत्रसंचालन वैभव गाडगीळ यांनी केले तर शेवटी डॉ. श्याम काणकोणकर यांनी आभार मानले. या शिबिराचा 592 नागरिकांनी लाभ घेतला.









