वैद्यकीय सेवा सर्वांसाठी असल्याची फलकाद्वारे जागृती
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डचे हॉस्पिटल हे केवळ लष्करी कर्मचारी अथवा कॅन्टोन्मेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाच नाही तर शहरातील सर्वांसाठीच वैद्यकीय सेवा देते. मात्र, ही बाब बऱ्याच नागरिकांना माहीत नसल्याने तेथील वैद्यकीय सेवेचा लाभ घेताना दिसत नाहीत. यासाठी आता कॅन्टोन्मेंट बोर्डने जागृती करण्यास सुरुवात केली असून फलक लावून आरोग्य सुविधांची माहिती दिली जात आहे. बेळगाव शहराच्या मध्यभागी कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द येते. कॅम्प तसेच किल्ला येथील परिसराचा समावेश कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत होतो. कॅन्टोन्मेंट बोर्ड चालविण्याचे काम मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर, कॅन्टोन्मेंटचे सीईओ तसेच सदस्य करीत असतात.
नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयाच्या समोरील बाजूस हॉस्पिटल सुरू करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये अनेक सेवा दिल्या जात आहेत. मराठा मंडळ डेंटल कॉलेज, केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यासह इतर हॉस्पिटलच्या सहकार्याने या ठिकाणी विविध विभाग सुरू ठेवण्यात आले आहेत. हॉस्पिटलमधील सेवांबाबत नागरिकांना माहिती नसल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. चांगल्या सुविधा असतानाही केवळ जागृती नसल्याने रुग्णांची संख्या कमी असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लक्षात आले. याबाबत नुकत्याच झालेल्या बोर्ड मिटींगमध्येही चर्चा झाली होती. यावेळी सीईओ राजीवकुमार यांनी आपण जागृती करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
हॉस्पिटलमध्ये या सुविधा उपलब्ध
कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर, लेबररूम, एक्स-रे, सोनोग्राफी, लॅबोरेटरी, डेंटल, होमिओपॅथी, आयुर्वेदिक विभाग सुरू आहेत. त्याचबरोबर जनरल सर्जरी, आय ट्रिटमेंट, लहान मुलांचे आजार, त्वचातज्ञ, रेडिओलॉजी, गायनॅकोलॉजी असे विविध डॉक्टर सेवा देत असतात. या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने वेळोवेळी केले आहे.









