जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
आळंबी उत्पादन, मधमाशा पालन, गृहोपयोगी वस्तु तयार करणे, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, बकरी पालन, संगणक ऑपरेटर, टेलरिंग, फोटोग्राफी यासह कृषीसंबंधी असणाऱ्या कौशल्याधारित प्रशिक्षणांचा लाभ घेण्यात यावा आणि स्वयंउद्योगी व्हावे, असे आवाहन जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले.
जिल्हा पंचायत सभागृहामध्ये शनिवारी कॅनरा बँक ग्रामीण स्वयंद्योग प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सल्ला समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक प्रशिक्षणे आयोजित केली जातात. या प्रशिक्षणांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वयंद्योगी व्हावे, असा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यासाठी कॅनरा बँक ग्रामीण स्वयंउद्योग प्रशिक्षण संस्थेकडून अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते. याचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कॅनरा बँक ग्रामीण स्वयंउद्योग प्रशिक्षण संस्थेचे संचालक संतोषकुमार म्हणाले, दुग्ध व्यवसाय, ब्युटीपार्लर, मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये 233 जणांनी सहभाग घेतला होता. 203 जणांना बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे योजनाधिकारी डॉ. एम. कृष्णराजू, कॅनरा बँक विभागीय व्यवस्थापक धानी वरगेर, नाबाडचे डीडीएम अभिनव यादव आदी उपस्थित होते









