पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होणार असून, कोकण वगळता राज्यात सर्वत्र अवकाळीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रातील काही भागात सध्या अवकाळी पाऊस होत आहे. याबरोबरच मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पाराही चाळीशीच्या पार पोहोचला आहे. शुक्रवारी मुंबई,ठाण्यासह कोकणाच्या अनेक भागांत उष्मा अधिक नोंदविण्यात आला. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्हे उन्हाच्या कडाक्याने होरपळली असून, या भागात 42 अंशांच्या वर कमाल तापमान आहे. पुढील दोन दिवस हे तापमान कायम राहणार आहे.
कोकण वगळता सर्वत्र अवकाळी
दरम्यान, शनिवारी तसेच रविवारी विदर्भाला सोसाटय़ाच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस सोमवार व मंगळवारी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ालाही अवकाळीच्चा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कमाल तापमानही वाढणार
पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान कायम असेल. थ्यानंतर मात्र त्यात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याने सतर्कतेच्या सूचना हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासूनच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यातही अवकाळीचा दणका बसल्याने आता बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातच उष्माघातानेही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.








