मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : ‘स्वयंपूर्ण मित्र’ मोहिमेची तीन वर्षे पूर्ण,मुख्यमंत्र्यांनी घेतला मोहिमेचा आढावा
पणजी : ‘स्वयंपूर्ण मित्र’ मोहिमेला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने राज्यातील विविध स्वयंपूर्ण मित्रांकडे संवाद साधला. यावेळी बोलताना ‘स्वयंपूर्ण ई बाजार’ दसऱ्यापासून चालू करण्याची घोषणा त्यांनी केली. शिवाय त्यांनी एकंदरीत स्वयंपूर्ण मित्र मोहिमेचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले की, यंदा गणेशचतुर्थीला ई बाजार सुरू करण्यात आला. त्यास राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे 800 पेक्षा अधिक ऑर्डर्स (मागण्या) नोंदवण्यात आल्या आणि त्यानुसार विविध उत्पादनांचा पुरवठा करण्यात आला. अनेक महिलांना, स्वयंसेवी गटांना ई चतुर्थी बाजाराचा लाभ मिळाला. त्यांनी आपली उत्पादने घरातूनच खरेदी -विक्री केली.
राज्यासह देशभरात खरेदी-विक्री
याच धर्तीवर स्वयंपूर्ण ई बाजार सुरू करण्याची तयारी होत आहे. त्या माध्यमातून भोजन, चहा, फराळ, नाश्ता इतर अन्न, खाद्यपदार्थ यांची खरेदी-विक्री करणे शक्य होणार आहे. या ई बाजारातून गावागावातील, शहरातील विविध उत्पादने राज्यात सर्वत्र, तसेच देशभर विक्री करणे सोपे झाले आहे. या ई बाजारसाठी गावातील सुमारे 230 ग्रामीण मित्रांची मदत घेण्यात येणार असून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील विशेष उत्पादने इतर साहित्य शोधून ते सर्व ई बाजारातून उपलब्ध करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अन्नपूर्ण योजना 1 नोव्हेंबरपासून
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत महिला स्वयंसेवी गटांना सरकारी खात्यांची कँटीन चालवणे शक्य होणार आहे. त्या गटांनाच ती चालवण्यास देण्यात येणार असून त्यासाठी रु. 1000 एवढेच नाममात्र भाडे आकारण्यात येणार असल्याची महिती त्यांनी दिली.
ही योजना महिलांना सुवर्णसंधी
या योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली असून महिलांचा आर्थिक विकास आणि सशक्तीकरण हा त्यामागील उद्देश आहे. महिलांनी पुढे येऊन या योजनेत सहभागी व्हावे. महिला स्वयंसेवी गटांना सदर योजना म्हणजे सुवर्णसंधी असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिसूचनेतून करण्यात आले आहे.
योजनेची अधिसूचना जारी
या योजनेच्या माध्यमातून महिला गटांना शैक्षणिक संस्था, महामंडळे, सरकारी खाती इत्यादी अनेक ठिकाणी कँटीन चालवण्याची अनुमती मिळणार आहे. गोव्यात 4000 पेक्षा अधिक स्वयंसेवी महिला गटांची नोंदणी असून त्यांनी या योजनेत सहभागी व्हावे अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यांतून महिलांना रोजगार मिळणार आहे. ग्रामीण विकास खात्याचे संयुक्त सचिव भूषण सावईकर यांनी या योजनेची अधिसूचना जारी केली आहे. योजनेची संपूर्ण माहिती त्यात देण्यात आली असून सर्व महिला स्वयंसेवी गटांनी ती वाचावी आणि त्यानुसार पावले उचलावीत असे अधिसूचनेत म्हटले आहे. गोव्याचे सरकार अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय अशा पद्धतीने चालत असून त्याच धर्तीवर विकास पुढे नेण्याचे काम सरकार करीत आहे. स्वयंपूर्ण मित्रांशी ऑनलाईन मार्गाने संवाद साधताना डॉ. सावंत बोलत होते. त्यांनी मित्रांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच जनतेने विकासात सहकार्य द्यावे, असे सूचवले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटक पंतप्रधान
गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 व 26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथे येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी ऑनलाईन संवादातून दिली. स्पर्धांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उद्घाटन सोहळा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.