बागायत खात्याकडून विकसित
बेळगाव : बागायत खात्याच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हवामानाचा अंदाज देणारे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) यंत्र विकसित करण्यात आले असून, बागायत शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. हवामानातील बदलाची माहिती शेतकऱ्यांना या यंत्रामुळे वेळीच मिळणार आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार असून उत्पादन दर्जेदार घेणे शक्य होईल, असा दावा बागायत खात्याने केला आहे. जिह्यात 57 हजार हेक्टर बागायत जमीन असून, यापैकी 32 हजार हेक्टर जमिनीत भाजीपाला, 15 हजार हेक्टर जमिनीत द्राक्षे, डाळिंब, आंबा, पेरू, चिक्कू, ड्रॅगन फ्रूट व उर्वरित जमिनीमध्ये सुंठ, मिरे यासारखे उत्पादन घेण्यात येते. बागायत पिकांना आवश्यक तेवढेच पाणी द्यावे लागते. काहीवेळा अधिक पाण्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. पाणी कमी झाले तर पिकांची वाढ व्यवस्थित हेत नाही, परिणामी उत्पादनावर परिणाम होतो. मात्र, स्वयंचलित यंत्रामुळे बागायत पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देऊन भरघोस उत्पादन घेणे शक्य असल्याचे बागायत खात्याचे म्हणणे आहे.
पाऊस होण्याचा अंदाज तीन-चार दिवस अगोदरच
स्वयंचलित यंत्र पाऊस होण्याचा अंदाज तीन-चार दिवस अगोदरच देते त्याचबरोबर शेतजमिनीतील पाण्याची शोषण पातळी समजावून देण्याबरोबरच बागायती पिकांना पाणी केव्हा व किती द्यावे याचीही माहिती देते. वाऱ्याचा वेग, पिकांवर कोणता रोग पडण्याची शक्यता आहे. रोगावर कोणत्या कीटकनाशाची फवारणी करावी. ठिबक सिंचनद्वारे पिकांवर कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी हेही स्वयंचलित माहिती देते, त्यामुळे स्वयंचलित यंत्र बागायत शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरणार आहे.









