सातारा :
एकसर (ता. वाई) गावातील पुलावरून मंगळवारी सकाळी रिक्षा चालकाचा ताबा सुटला. रिक्षासह चालक ओढ्याच्या पात्रात पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशाल मुगटराव कळंबे (रा. एकसर) असे चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिक्षाचालक विशाल कळंबे हे मंगळवारी रिक्षा घेऊन घरातून निघाले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते वाईच्या दिशेने जात असताना त्याचा रिक्षावरील ताबा सुटला. यामुळे रिक्षा थेट एकसर गावच्या पुलावरून ओढ्याच्या पात्रात पडली. रिक्षाचा चुराच झाल्याने विशाल हे गंभीर जखमी झाले. काही प्रवाशांनी हा अपघात पाहून स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ वाई पोलिसांनी कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ओढ्यातून विशाल यांना वर आणून रूग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ होत आहे. या अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.








