सातारा :
दारुच्या नशेत बेफामपणे रिक्षा चालवत निघाल्याची बाब ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी भाग्यश्री जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या रिक्षा चालकास अडवण्याचा प्रयत्न दुचाकीवरुन पाठलाग करुन केला. दरम्यान, रिक्षा चालक आपली रिक्षा ताणत निघाला असतानाच त्याच्या रिक्षामध्ये महिला कर्मचारी जाधव यांचे जर्किंन अडकले. त्यामुळे त्याही फरफटत दोनशे मीटर रिक्षासोबत गेल्या. त्यात त्या जखमी झाल्या असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संबंधित रिक्षा चालकास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा बसस्थानकाकडून खंडोबाच्या माळाकडे भरधाव वेगाने रिक्षा चालक चालला होता. त्याच्या रिक्षा चालवण्याच्या पद्धतीमुळे कोणाचा तरी अपघात व्हायचा म्हणून तेथेच ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचारी भाग्यश्री जाधव यांनी लगेच दुचाकीवरुन त्याचा पाठलाग करुन त्यास अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सुसाटच होता. त्यातच त्याच्या रिक्षामध्ये त्यांचे जर्किन अडकले अन् दुचाकीचा तोल गेला. तोच त्या रिक्षासोबत फरफटत 200 मीटर त्या रिक्षा चालकाने नेले. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच आरडाओरडा केल्यानंतर त्याने रिक्षा थांबवली. तोपर्यंत जाधव या जखमी झाल्या होत्या. वाहतूक शाखेचे इतर कर्मचारी, शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या रिक्षा चालकास ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, जखमी झालेल्या भाग्यश्री जाधव यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- वाहतूक शाखा दिवसभर ऑन फिल्ड
सकाळपासून पावसाची रिपरिप शहरात सुरु असून ग्रेड सेपरेटरमध्ये अनेक वाहने घसरत होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सातारा वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव हे स्वत: पावसात भिजून वाहतूकीला शिस्त लावत होते. परंतु सायंकाळच्या सुमारास एका मद्यपी रिक्षा चालकाने एका महिला कर्मचाऱ्यास फरफटत नेल्याचा प्रकार घडल्याने रिक्षा चालकांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त होवू लागलेला आहे.








