फाडाची माहिती : लग्नसराईमुळे सकारात्मक कामगिरी झाल्याचे निरीक्षण : कारची किरकोळ विक्री 7 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जानेवारी 2025 मध्ये देशातील कारची किरकोळ विक्री वर्षाच्या आधारे 7 टक्क्यांनी वाढून 22,91,621 युनिट्सवर पोहोचली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांनी गुरुवारी ही माहिती दिली. जानेवारी 2024 मध्ये ही विक्री 21,49,117 युनिट्स होती. सर्व श्रेणींमध्ये जानेवारीमधील लग्नसराईला प्रारंभ झाल्याच्या गोष्टीमुळेही सकारात्मक वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. फाडाचे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर म्हणाले, ‘आमच्या निरीक्षणानुसार, आम्हाला दोनचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहन, ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहने या सारख्या प्रत्येक वाहन विभागात सकारात्मक वाढ दिसून आली आहे. हे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि स्थिर बाजारपेठेची स्थिती दर्शवत’ आहे. जानेवारीमध्ये प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री वर्षाच्या आधारावर 16 टक्क्यांनी वाढून 4,65,920 युनिट्सवर पोहोचली. यात वाढत्या मागणीने मोठी भूमिका बजावली आहे. विघ्नेश्वर म्हणाले की, अनेक डीलर्सनी गेल्या वर्षी वाढलेली मागणी आणि मोठ्या सवलतींचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे जुने मॉडेल्स विकण्यास आणि नोंदणी हस्तांतरित करण्यास मदत झालेली आहे.
दुचाकी वाहनांच्या विक्रीत 4 टक्क्यांची वाढ
गेल्या महिन्यात दुचाकी वाहनांची किरकोळ विक्री 15,25,862 युनिट्सवर पोहोचली, जी जानेवारी 2023 मध्ये 14,65,039 युनिट्स होती. ही 4 टक्क्यांनी वाढ आहे. शहरी भागात विक्री तेजीत राहिली आणि वर्षाच्या आधारावर 5 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली, तर ग्रामीण भागात ती कमी राहिली. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की नवीन मॉडेल्स, वैवाहिक मागणी आणि मजबुत वित्तपुरवठा यांनी विक्री वाढविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. वाहनांचा साठा पूर्वीपेक्षा चांगला आहे. आता स्टॉक पातळी सुमारे 5 दिवसांनी कमी होऊन 50-55 दिवस झाली आहे. हे पुरवठा आणि मागणीमधील संतुलन दर्शवते.
व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टरची विक्री वाढली
जानेवारीमध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री 8 टक्क्यांच्या वाढीसह 99,425 युनिट्सवर पोहोचली. ट्रॅक्टरची विक्री 5 टक्के वाढून 93,381 युनिट्सवर पोहोचली आणि तीनचाकी वाहनांची विक्री 7 टक्क्यांनी वाढून 1,07,033 युनिट्सवर पोहोचली. तथापि, वाढत्या व्याजदरांमुळे, ग्रामीण भागात रोख रकमेची टंचाई आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे डीलर्स चिंतेत आहेत.









