बेस्ट सेलर लेखक-कविंच्या नावाने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे लिहिण्यात आलेली नकली पुस्तके ऑनलाइन विकली जात आहेत. बेस्ट सेलर लेखिका जेन फ्रीडमॅन यांना एका त्यांच्या चाहत्याने त्यांचे नवे पुस्तक वाचल्याचे कळविले होते. फ्रीडमॅन यांना हे कळल्यावर धक्काच बसला, कारण फ्रीडमॅन यांनी 2018 नंतर कुठलेच पुस्तक लिहिले नव्हते. फ्रीडमॅन यांनी यासंबंधी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर पडताळणी केली असता त्यांच्या नावाचा वापर करून अशाप्रकारची 8 पुस्तके उपलब्ध असल्याचे आढळून आले.

प्रत्यक्षात त्यांनी ही पुस्तके लिहिलीच नव्हती. ही सर्व पुस्तके एआय जनरेटेड होती. एआय लेखकांच्या भाषाशैलीला देखील कॉपी करतो. अन्य लेखकांच्या नावाचाही दुरुपयोग करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात नकली पुस्तके विकली जात असल्याचे फ्रीडमॅन यांना आढळून आले. अशाप्रकारच्या कृत्याला रोखण्यासाठी सद्यस्थितीत कुठलाच कायदा नाही. एआयकडून भाषाशैली अन् रचना प्रक्रिया हुबेहुब कॉपी केली जाते. यामुळे खऱ्या आणि खोट्यामधील फरक ओळखणे अवघड आहे. एआय लेखकांच्या शैलीत मोठ्या प्रमाणात मजकूर तयार करू शकते. हा प्रकार रोखण्यासाठी 10 हजारांहून अधिक लेखकांच्या ऑथर्स गिल्डने पत्र लिहिले आहे. यात एआय टूल्सद्वारे साहित्यकृतींची नक्कल करण्यासाठी रॉल्टी आणि सहमती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.









