संगणक उतारेही देण्याची ग्रामस्थांची मागणी : शेतवडीत बांधलेल्या घरांची ग्राम पंचायतींकडून करवसुली : शासनाने दखल घेण्याची गरज
वार्ताहर/उचगाव
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने आपल्या शेतवडीतील सर्व्हे नंबर असलेल्या हक्काच्या जागेत लाखो रुपये खर्च करून राहण्यासाठी नवीन इमारतींची बांधणी केली आहे. अनेक भागात लेआउट झालेल्या प्लॉटमधील एनए लेआउट प्लॉट घेणे शेतकरी वर्गाला शक्य नाही. त्यामुळे स्वत:च्याच जागेत अनेकांनी आपल्या इमारती आज उभ्या केल्या आहेत. ग्रामपंचायतच्या नियमानुसार गावठाण एरिया सोडून घरे बांधल्याने त्यांना अद्याप ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून कॉम्प्युटर उतारे मिळत नसल्याने अशा हजारो इमारतधारकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यासाठी शासनाने तातडीने सर्व्हे नंबरमधील घरांना अधिकृत ठरवून त्यांना कॉम्प्युटर उतारे तातडीने द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात गावठाण एरिया आहे. आणि एरिया मर्यादित जी पूर्वी घरी आहेत, किंवा नवीन घरांची उभारणी करण्यात आली आहे त्यांनाच ग्रामपंचायत दप्तरी घरांची नोंद केली जाते. आणि त्यांना कॉम्प्युटर उतारा मिळण्याची व्यवस्था आहे.
मात्र दिवसेंदिवस लोकसंख्या भरमसाठ वाढत असल्याने पूर्वीच्या जुन्या मातीच्या कमी जागेत असलेली घरे सोडून नागरिकांना प्रशस्त घरांची बांधणी करणे गरजेचे वाटत असल्याने गावठाण एरिया सोडून गावालगतच्या चोहोबाजूला असलेल्या सर्व्हे नंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या स्वत:च्या हक्काच्या जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये नागरिकांनी नवीन स्वत:च्या हक्काची घरे उभारली आहेत. मात्र या घरांना ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून घेतली जात नाही. टॅक्स बसवला जात नाही. एनओसी मिळत नाही आणि कॉम्प्युटर उतारा मिळत नाही. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी शासनाने तातडीने सर्व्हे नंबरमधील जी घरे नागरिकांनी बांधली आहेत त्यांना सर्व सुविधा ग्रामपंचायतमार्फत मिळाव्यात आणि कॉम्प्युटर उतारे तातडीने मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.
70 वर्षांनंतही घरे अनधिकृतच
गावठाण क्षेत्राचा सर्व्हे यापूर्वी 1950 मध्ये झालेला आहे. आज 70 वर्षे उलटल्यानंतर लाखो घरे गावठाण क्षेत्राच्या बाहेर बांधली आहेत. जी आजही शासनाच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. त्यासाठी गावची हद्द निश्चित करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने यापूर्वी निर्णय घेतला होता. पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. आता गावठाण क्षेत्राच्या बाहेर असलेला घरांनादेखील ऑनलाईन उतारे देण्यासह करवसुली केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात अजून ही योजना अमलात आणली गेली नाही. यासाठी शासनाने कायद्यात लवकरच दुरुस्ती करून गावठाण हद्दीचे पूर्ण सर्वेक्षण करावे आणि सर्व्हे क्रमांकमध्ये असलेल्या नागरिकांना तातडीने त्यांना ग्रामपंचायतच्या सर्व सुविधा मिळवून द्याव्यात आणि कॉम्प्युटर उतारे द्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.









