वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याने 2026 च्या राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनातून अंग काढून घेतले आहे. अंदाजित खर्चात वाढ झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. व्हिक्टोरियाचे प्रमुख डॅनियल अँड्य्रूज यांनी मंगळवारी सांगितले की त्यांच्या सरकारने गेल्या वर्षी या खेळांच्या पुढील आवृत्तीचे आयोजन करण्यास सहमती दर्शविली होती, परंतु ती कोणत्याही किंमतीवर आयोजन करण्यासाठी नव्हती.
ते म्हणाले की त्यांच्या सरकारने सुऊवातीला पाच प्रादेशिक शहरांमध्ये खेळांचे आयोजन करण्यासाठी 2.6 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतके बजेट ठेवले होते. परंतु अलीकडील अंदाजानुसार संभाव्य खर्च 7 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सवर जाईल. अँड्य्रूज यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी राष्ट्रकुल खेळांच्या आयोजकांना आयोजन करारातून बाहेर पडण्याच्या त्यांच्या सरकारच्या निर्णयाबद्दल सूचित केले आहे.
आजचा दिवस त्या खर्चाच्या अंदाजांमध्ये दोष शोधण्याचा नाही, असे ते म्हणाले. मात्र खर्च वाढण्यामागच्या कारणांची रूपरेषा देण्यास त्यांनी नकार दिला. खरे सांगायचे तर, 12 दिवसांच्या क्रीडा स्पर्धेसाठी 6 ते 7 अब्ज डॉलर्स खर्च आम्ही करणार नाही. इतका खर्च करण्याइतके ते मूल्यवान नाही. यात सर्व खर्च आहे आणि कोणताही फायदा नाही, असे अँड्य्रूज यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रकुल खेळांच्या महासंघाने एक निवेदन जारी करून ते त्यांच्या पर्यायांबद्दल सल्ला घेत आहेत, असे स्पष्ट केले आहे. अंदाजित खर्चात वाढ ही प्रामुख्याने प्रादेशिक, बहुशहर आयोजन मॉडेल आणि व्हिक्टोरिया सरकारच्या स्थळांच्या योजना बदलण्याच्या आणि अधिक खेळांचा समावेश करण्याच्या निर्णयामुळे झाली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. आम्ही निराश झालो आहोत. कारण आम्हाला फक्त आठ तासांची नोटीस देण्यात आली आणि सदर सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी संयुक्तपणे उपाय शोधण्याच्या दृष्टीने चर्चा करण्याचा कोणताही विचार केला नाही, असे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.









