वृत्तसंस्था / सेंट किट्स
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा विंडीज दौरा 100 टक्के यशस्वी ठरला आहे. या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने विंडीजविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी तर त्यानंतरची पाच सामन्यांची टी-20 मालिका 5-0 अशी एकतर्फी जिंकली आहे. या दौऱ्यातील आठही सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विंडीजला पराभूत करण्याचा पराक्रम केला. या दौऱ्यातील टी-20 मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 18 चेंडू बाकी ठेवून 3 गड्यांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनला ‘मालिकावीर’ तर बेन ड्वारशुईसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजचा डाव 19.4 षटकात 170 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 17 षटकात 7 बाद 173 धावा जमवित हा सामना 3 गड्यांनी आणि 18 चेंडू बाकी ठेवून जिंकला. ऑस्ट्रेलियाने आपल्या विंडीज दौऱ्याला शेवटचा सामना जिंकून निरोप दिला.
विंडीजच्या डावामध्ये हेटमायरने 31 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 52 तर रुदरफोर्डने 17 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 35, होल्डरने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20, फोर्डने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15, किंगने 2 चौकारांसह 11 तर अकिल हुसेनने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 7 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 49 धावा जमविताना 3 गडी गमविले. विंडीजने 10 षटकाअखेर 4 बाद 84 धावा जमविल्या होत्या. विंडीजचे अर्धशतक 38 चेंडूत, शतक 69 चेंडूत तर दीड शतक 101 चेंडूत नोंदविले गेले. हेटमायरने 30 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकविले. ऑस्ट्रेलियातर्फे ड्वारशुईसने 41 धावांत 3, इलीसने 32 धावांत 2 तर हार्डी, अॅबॉट, मॅक्सवेल आणि झाम्पा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झाम्पाचा हा 100 वा टी-20 सामना होता.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात मिचेल ओवेनने 17 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 37, टीम डेव्हीडने 12 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारांसह 30, कॅमरॉन ग्रीनने 18 चेंडूत 5 चौकारांसह 32, कर्णधार मार्शने 3 चौकारांसह 14, इंग्लिसने 2 चौकारांसह 10 तर अॅरॉन हार्डीने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 8 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे अकिल हुसेनने 17 धावांत 3 तर होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 67 धावांत 4 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 25 चेंडूत, शतक 48 चेंडूत तर दीड शतक 79 चेंडूत नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 19.4 षटकात सर्वबाद 170 (हेटमायर 52, रुदरफोर्ड 35, होल्डर 20, फोर्ड 15, किंग 11, अकिल हुसेन 11, ड्वारशुईस 3-41, इलीस 2-32, हार्डी, अॅबॉट, मॅक्सवेल, झाम्पा प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 17 षटकात 7 बाद 173 (ओवेन 37, डेव्हीड 30, ग्रीन 32, इंग्लिस 10, मार्श 14, हार्डी नाबाद 28, अकिल हुसेन 3-17, होल्डर आणि अल्झारी जोसेफ प्रत्येकी 2 बळी)









