न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र, जिमी नीशमची झुंज व्यर्थ : कांगारुंचा सलग चौथा विजय
वृत्तसंस्था/ धरमशाला
धरमशाला येथे झालेल्या ट्रान्सटास्मानियन लढतीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर अवघ्या पाच धावांनी थरारक विजय मिळवला. 389 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने कडवी झुंज देताना 50 षटकात 383 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने 19 धावांचा यशस्वी बचाव केला. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन यांनी शानदार फिल्डिंग करुन जिमी निशीमला धावा काढण्यापासून रोखले. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने 116 धावा तर अखेरीस जिमी नीशमने अर्धशतकी झुंज दिली. विशेष म्हणजे, या सामन्यात दोन्ही डावात मिळून 771 धावा झाल्या. विश्वचषकाच्या सामन्यात पहिल्यांदाच इतक्या धावा झाल्या आहेत. तसेच या सामन्यात 65 चौकार आणि 32 षटकार पाहायला मिळाले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचा हा सहा सामन्यातील चौथा विजय ठरला आहे. या विजयासह गुणतालिकेत ते आठ गुणासह चौथ्या स्थानावर आहेत. तर किवीज संघाचा या वर्ल्डकपमधील दुसरा पराभव असून आठ गुणासह ते तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. 67 चेंडूत 109 धावांची खेळी साकारणाऱ्या ट्रेव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
रचिन रविंद्रचे वर्ल्डकपमधील दुसरे शतक, नीशमचीही झुंजार खेळी

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 389 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. पण ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. डेवॉन कॉनवे आणि विल यंग यांनी सात षटकात 61 धावांची सलामी दिली. कॉनवाने 28 धावांचे योगदान दिले. विल यंग 32 धावांवर बाद झाला. दोघांनाही हॅजलवूडने बाद केले. यानंतर रचिन रविंद्रने डॅरेल मिचेलसोबत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनी एकेरी दुहेरी धावसंख्यासोबत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रविंद्रने 89 चेंडूत 9 चौकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. त्याचे हे यंदाच्या वर्ल्डकपमधील दुसरे शतक ठरले. 23 वर्षाच्या रचिनने ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इतर अनुभवी फलंदाज बाद होत असताना त्याने सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश केला.
मिचेलने 51 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 54 धावांचे योगदान दिले. कर्णधार टॉम लेथम आणि ग्लेन फिलिप्स यांना मोठी खेळी करता आली नाही. लॅथमने 22 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. तर ग्लेन फिलिप्स 12 धावांवर बाद झाला. मिचेल सँटनर 17 धावा काढून तंबूत परतला. मॅट हेन्रीला 9 धावा करता आल्या. अष्टपैलू जीमी निशमने अखेरपर्यंत लढा दिला. अखेरच्या टप्प्यात नीशमने शर्थीचे प्रयत्न करत अर्धशतक ठोकले. मात्र, एक चेंडू शिल्लक असताना तो धावबाद झाल्यामुळे न्यूझीलंड संघाला पाच धावांनी पराभूत व्हावे लागले. नीशमने 39 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 58 धावांचे योगदान दिले. ट्रेंट बोल्ट 10 धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाचा 388 धावांचा डोंगर
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तब्बल एक महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या ट्रेव्हिस हेडने शतकी खेळी खेळली. हेड आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामीची जोडी आज वेगळ्याच रंगात होती. या दोघांनी अवघ्या 19.1 षटकांत 175 धावांची जबरदस्त भागीदारी केली. वॉर्नर व हेडने किवीज गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. वॉर्नरने 65 चेंडूत 5 चौकार व 6 षटकारासह 81 धावा केल्या. यानंतर वॉर्नर ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर झेलबाद होताच कांगारू संघाने पुढील 100 धावांत 5 गडी गमावले. फिलिप्सने पाठोपाठ 3 विकेट घेतल्या. वॉर्नरशिवाय यात ट्रॅव्हिस हेड (109) याचाही समावेश होता. हेडने 59 चेंडूत शतक झळकावले, पण तोही फिलिप्सच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. हेडने 67 चेंडूत 109 धावा केल्या. हेडने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 7 षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मिचेल मार्शने 2 चौकारासह 36 धावा फटकावल्या. मार्शचा अडथळा सँटेनरने दूर केला.
यानंतर स्टीव्ह स्मिथ (18) धावा करून फिलिप्सच्या चेंडूवर बोल्टकडे झेलबाद झाला. मार्नस लॅबुशेनही सँटनरच्या फिरकीत अडकला आणि 18 धावांवर बाद झाला. लॅबुशेन बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 274 अशी होती. त्यानंतर शेवटी ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस, कर्णधार पॅट कमिन्सने स्फोटक फलंदाजी केली. मॅक्सवेलने 24 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 41 धावा केल्या तर इंग्लिशने 28 चेंडूत 38 आणि कमिन्सने 14 चेंडूत 37 धावा कुटल्या. कमिन्स बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने कांगारुंचा डाव 49.2 षटकांत 388 धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 49.2 षटकांत सर्वबाद 388 (डेव्हिड वॉर्नर 81, ट्रेव्हिस हेड 109, मार्श 36, ग्लेन मॅक्सवेल 41, इंग्लिश 38, पॅट कमिन्स 37, बोल्ट व फिलिप्स प्रत्येकी तीन बळी, मिचेल सँटेनर दोन बळी).
न्यूझीलंड 50 षटकांत 9 बाद 383 (कॉनवे 28, विल यंग 32, रचिन रविंद्र 116, मिचेल 54, जेम्स नीशम 58, बोल्ट नाबाद 10, अॅडम झम्पा तीन बळी, हॅजलवूड व पॅट कमिन्स प्रत्येकी दोन बळी).
हेडची कमाल ! महिन्याभरानंतर आला आणि इतिहास रचला
विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. उभय संघातील चौथ्या वनडे सामन्यात आफ्रिकन वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीचा शॉर्ट चेंडू हेडच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. यात त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला. यानंतर तो संपूर्ण वर्ल्डकपमधून बाहेर पडेल असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे सामने केवळ 14 खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली नाही. आता 42 दिवसांनंतर ट्रेव्हिस हेड फिट होऊन मैदानात परतला आणि आपल्या पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात धमाकेदार शतक ठोकले. हेडने न्यूझीलंडविरुद्धच्या केवळ 59 चेंडूत शतक पूर्ण केले. या यंदाच्या वर्ल्डकपमधील स्पर्धेतील हे तिसरे जलद शतक आहे. तसेच वनडे क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे हे चौथे जलद शतक आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद वनडे शतक
ग्लेन मॅक्सवेल 40 चेंडूत वि. नेदरलँड (दिल्ली) 2023
ग्लेन मॅक्सवेल 51 चेंडूत वि. श्रीलंका (सिडनी) 2015
जेम्स फॉकनर 57 चेंडूत वि. भारत (बंगळुरू) 2013
ट्रेव्हिस हेड 59 चेंडूत वि. न्यूझीलंड (धर्मशाला) 2023.
मॅक्सवेलचा वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार

मॅक्सवेलने किवीजविरुद्ध सामन्यात 24 चेंडूत 41 धावा केल्या. मात्र, या खेळीतही त्याने एक विक्रम नोंदवला. तो म्हणजे यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार होय. मॅक्सवेलने टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचा लांब षटकाराचा विक्रम मोडीत काढला आहे. मॅक्सवेलने या डावात 104 मीटरचा गगनचुंबी षटकार मारला. हा षटकार यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार ठरला. मॅक्सवेलने मारलेला चेंडू थेट धरमशाला स्टेडिअमच्या छतावर जाऊन पडला. यापूर्वी श्रेयस अय्यरने 101 मीटर लांबीचा षटकार मारला होता. या यादीत तिसऱ्या स्थानी डेविड वॉर्नर (98 मी), डॅरिल मिचेल (98 मी) आणि डेविड मिलर (95 मी) यांचा समावेश आहे.
शेवटच्या षटकातील थरार
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 389 धावांचे आव्हान दिल्यानंतर रचिन रवींद्र व डेरिल मिचेल यांनी उत्कृष्ट भागीदारी संघाचे आव्हान कायम ठेवले. हे दोघे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या सर्व अपेक्षा अष्टपैलू जिमी निशामवर अवलंबून होत्या. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 19 धावांची गरज होती. मिचेल स्टार्क टाकत असलेल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर बोल्टने एक धाव घेत निशमला स्ट्राइक दिली. त्यानंतर स्टार्कने टाकलेला वाईड चेंडू यष्टीरक्षक इंग्लिश अडवू शकला नाही व न्यूझीलंडला पाच धावा मिळाल्या. यामुळे न्यूझीलंडसाठी 5 चेंडूवर 13 धावा असे समीकरण तयार झाले. पुढील चेंडूवर दोन धावा निघाल्याने चार चेंडूत 11 धावा असे सोपे समीकरण न्यूझीलंडच्या बाजूने होते. त्याच्या पुढील चेंडूवर निशामने जोरदार खेळलेला फटका मॅक्सवेलने अडवत दोन महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या. चौथ्या चेंडूवर देखील लॅबुशेनने सीमारेषेवर अशाच प्रकारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत, दोन महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या. अखेरच्या दोन चेंडूंवर सात धावांची गरज असताना निशाम फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्यात अपयशी ठरला. याचवेळी तो दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर फर्ग्युसन हा एकही धाव काढण्यात अपयशी ठरल्याने ऑस्ट्रेलियाने पाच धावांनी विजय मिळवला.









