दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून विजय : मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्शची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ डर्बन (द.आफ्रिका)
मॅथ्यू शॉर्ट (66) व कर्णधार मिचेल मार्श (नाबाद 79) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, द.आफ्रिकेने 20 षटकांत 8 बाद 164 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य 14.5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसरा व औपचारिक सामना आज होणार आहे. दरम्यान, 22 धावांत 3 बळी घेणाऱ्या सीन अॅबॉटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रझा हेंड्रिक्स 3 धावा काढून बाद झाला. तर रॉस्यू 6, टेंबा बवुमा 35, डेव्हिड ब्रेविस 0 हे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने आफ्रिकेची 4 बाद 46 अशी बिकट स्थिती झाली होती. यानंतर कर्णधार अॅडम मॅरक्रमने 38 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 49 धावांची शानदार खेळी साकारत संघाला शतकी टप्पा गाठून दिला. त्याला स्टबसने 20 चेंडूत 27 धावा करत चांगली साथ दिली. यानंतर तळाच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यामुळे आफ्रिकेला 20 षटकांत 8 बाद 164 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून सीन अॅबॉटने 22 धावांत 3 व नॅथन एलिसने 25 धावांत 3 गडी बाद केले.
मिचेल मार्श, शॉर्टची तुफानी अर्धशतके
विजयासाठीचे 165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य अवघ्या 14.5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सुरुवातीला सलामीवीर ट्रेव्हिस हेड 18 धावा काढून बाद झाला. त्याला लिजा विल्यम्सने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर मॅथ्यू शॉर्ट व मिचेल मार्श यांनी किवीज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी साकारली. शॉर्टने अवघ्या 30 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारासह 66 धावा फटकावल्या. तर मार्शनेही 39 चेंडूत 8 चौकार व 6 षटकारासह नाबाद 79 धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 20 षटकांत 8 बाद 164 (बवुमा 35, मॅरक्रम 49, स्टब्स 27, गेराल्ड कोटेज 11, एन्गिडी नाबाद 13, अॅबॉट व एलिस प्रत्येकी 3 बळी)
ऑस्ट्रेलिया 14.5 षटकांत 2 बाद 168 (मॅथ्यू शॉर्ट 30 चेंडूत 66, ट्रेव्हिस हेड 18, मिचेल मार्श नाबाद 79, लिजा विल्यम्स व तबरेज शाम्सी प्रत्येकी एक बळी).









