वृत्तसंस्था / ब्लोमफाउंटन (द. आफ्रिका)
डेव्हिड वॉर्नर आणि सामनावीर लाबुशेन यांची दमदार शतके आणि अॅडम झाम्पाची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने शनिवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 123 धावानी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवित 2-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 बाद 392 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 393 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यांची वनडे क्रिकेटमधील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 41.5 षटकात 269 धावात आटोपल्याने ऑस्ट्रेलियाने हा सामना 8.1 षटके बाकी ठेवत जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या वॉर्नरने 93 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 106 तर लाबुशेनने 99 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारांसह 124 धावा झळकविल्या. हेडने 36 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारासह 64 धावा जमविताना वॉर्नरसमवेत पहिल्या गड्यासाठी 11.1 षटकात 109 धावांची भागीदारी केली. वॉर्नर आणि लाबुशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 151 धावांची भागीदारी केली. इंग्लिसने 37 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 50 धावांचे योगदान देताना लाबुशेनसमवेत चौथ्या गड्यासाठी 83 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 9 षटकार आणि 48 चौकार नेंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे शम्सीने 61 धावात 4 तर रबाडाने 79 धावात 2 तसेच जॅन्सेन आणि फेहलुक्वायो यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात एकाही फलंदाजला 50 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सलामीच्या डी कॉकने 30 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 45, कर्णधार बवुमाने 40 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 46, व्हॅन डेर ड्युसेनने 1 चौकारासह 17, क्लासेनने 36 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 49, मिलरने 52 चेंडूत 6 चौकारासह 49, जॅन्सेनने 28 चेंडूत 2 षटकारासह 23, रबाडाने 15 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 17 तर नॉर्त्जेने 1 चौकारसह 10 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 12 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे झाम्पाने 48 धावात 4 तर अॅबॉट, इलिस आणि हार्डी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया 50 षटकात 8 बाद 392 (वॉर्नर 106, हेड 64, लाबुशेन 124, इंग्लिस 50, इलिस नाबाद 14, अॅबॉट नाबाद 7, अवांतर 17, शम्सी 4-61, रबाडा 2-79, जान्सेन 1-63, फेहलुक्वायो 1-50), दक्षिण आफ्रिका 41.5 षटकात सर्वबाद 279 (डी कॉक 45, बवुमा 46, व्हॅन डेर ड्युसेन 17, क्लासेन 49, मिलर 49, जान्सेन 23, रबाडा नाबाद 17, नॉर्त्जे 10, अवांतर 9, झाम्पा 4-48, हार्डी 2-62, इलिस 2-32, अॅबॉट 2-50).









