वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. यजमान भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या चार संघांमध्ये आता जेतेपदासाठी यापुढे चुरस राहिल. आतापर्यंत पाच वेळा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध चांगली कामगिरी करतो, असे मत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज व्हॅन डेर ड्युसेनने व्यक्त केले आहे.
या स्पर्धेत आता येत्या बुधवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य सामना गुरुवार दि. 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर खेळविला जाणार आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक लिग टप्प्यातील गेल्या महिन्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला होता. मात्र दक्षिण आफ्रिका संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. 2015 साली दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठली होती. 2015 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपद मिळविले होते तर 2021 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे कांगारूंनी अजिंक्यपद मिळविले होते.
भारतात होत सुरू असलेल्या या स्पर्धेत प्राथमिक फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असला तरी येत्या गुरूवारी होणारा उभय संघातील उपांत्य फेरीचा सामना निश्चितच चुरशीचा होईल, असे ड्युसेनने म्हटले आहे. 34 वर्षीय ड्युसेनने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या फलंदाजीत सातत्य राखताना दोन शतके आणि दोन अर्धशतके नोंदविली आहेत. दरम्यान या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी निश्चितच बहरली असून डिकॉक, बहुमा, ड्युसेन, क्लासन, माक्रेम हे उपयुक्त फलंदाज म्हणून आता ओळखले जात आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेत यजमान भारत आणि नेदरलँड्स या दोन संघांकडून पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना झगडत असल्याचे दिसून येते. उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांना विजयाची समान संधी असल्याचे ड्यूसेनने म्हटले आहे.









