कॅनबरा :
ऑस्ट्रेलियाच्या मशरुम किलरला तेथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेच्या अंतर्गत दोषी महिलेला 33 वर्षांनीच जामीन मिळू शकणार आहे. दोषी महिला एरिन पॅटर्सनने स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या आईवडिलांची हत्या केली होती. एरिनने स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या आईवडिलांसमवेत तीन जणांना विषारी मशरुम खायला देत ठार केले होते. 50 वर्षीय पॅटर्सनला जुलै महिन्यात हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. आता सोमवारी न्यायालयाने तिला कठोर शिक्षा सुनावली आहे. एरिनने 2023 मध्ये स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या पतीचे आईवडिल आणि नातेवाईकांना स्वत:च्या घरी जेवणासाठी बोलाविले होते. यादरम्यान एरिनने जेवणात विषारी मशरुम मिसळले होते, हे अन्न खाल्ल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता. पूर्ण जगात हे प्रकरण मशरुम मर्डर नावाने प्रसिद्ध झाले होते. एरिनचा स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत मुलांच्या खर्चावरुन भांडण सुरू होते. यातूनच तिने हा गुन्हा केल्याचे मानले जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार 33 वर्षांनी एरिनला जामीन मिळू शकणार आहे, त्यावेळी ती सुमारे 83 वर्षांची असणार आहे. तर एरिनकडे या शिक्षेच्या विरोधात दाद मागण्यासाठी 28 दिवसांची मुदत आहे.









