वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला दुखापत झाल्याने तो चालू महिन्याच्या अखेरीस भारताबरोबर होणाऱ्या वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सध्या ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून उभय संघातील टी-20 मालिका नुकतीच समाप्त झाली असून ही मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. या मालिकेत मॅक्सवेल सहभागी होऊ शकला नाही. डाव्या पायाच्या घोट्याला ही दुखापत झाली असून त्याला वारंवार वेदना आणि सूज येत असल्याने मॅक्सवेलला पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपली ही दुखापत लवकर बरी करुवून घ्यावी लागेल. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत तो धोका पत्करणार नाही अशी आशा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार असून या मालिकेतील पहिला सामना मोहालीत 22 सप्टेंबरला खेळविला जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकिय पक्षकाने मॅक्सवेलला या तिरंगी मालिकेसाठी विश्रांतीचा सल्ला दिल्याचे समजते.









